Tuesday, July 29, 2014
धनगर आरक्षणाची मागणी घटनात्मक
सध्या धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी या समाजाने मोठे आंदोलन छेडले आहे. धनगरांचा st प्रवर्गात समावेश करण्यास आदिवासी नेत्यांचा विरोध आहे. धनगर हे आदिवासी नाहीत आणि st प्रवर्गातील धनगड जमातीशी धनगरांचा काही संबंध नसल्याचा दावा त्यानी केला आहे. मुळात रसेल, बेंथोवेन, गुंथन सोंथायमर, इरावती कर्वे या मानववंशशास्त्रद्न्य/समाजशास्त्रद्न्य यानी सप्रमाण दाखवुन दिले आहे कि धनगर हे आदिवासीच आहेत. धनगराना आदिवासींप्रमाणे स्वत:ची अशी वैशिष्ट्यपूर्ण संस्क्रुती आहे. डोक्याला पागोटे, अंगात बंडी, लंगोट असा धनगरांचा पारंपरिक वेष आहे. धनगरांचे गजी न्रुत्य, ढोल, कैताळ, धनगरी ओवी अशी स्वतंत्र
लोककला आहे. मुगार, अंधरबोन, इर, घुगुळ, पात्रे भरणे, दुध शिजवणे अशा प्रकारचे आदिम सण आहेत जे इतर नागरी समाजात आढळत नाहीत. नागरी समाजप्रमाणे धनगर समाजात ब्राह्मण/गुरव हे पुजारी आढळत नाहीत. 'गावडा' हा धनगरांचा पुजारी त्याच समाजातून नियुक्त केला जातो. धनगरांचे बिरोबा, मायाक्का, सुराप्पा, शिंगू, काशिलिंग हे देवही इतर समाजात आढळत नाहीत. गेल्या दोन शतकातील समाजशस्त्रद्न्यांच्या अभ्यासावरुन धनगर हे आदिवासी असल्याचे स्पष्टपणे दिसते.
धनगर आरक्षणाबाबत
संविधानात अनुसूचित जमातीच्या महाराष्ट्राच्या यादीत नं. 36 वर ओरान, धनगड अशी नोंद आहे. धनगर-धनगड ही टंकलेखनातील चुक नसून तो भाषिक भेद आहे. जसे ओरिसा-ओडिसा, एकर-एकड,जाखर-जाखड इ. अनुसूचित जमाती मंत्रालयाच्या 2008-09, 09-10 च्या वार्षिक अहवालात इंग्रजी प्रतीमधे dhangad असे छापले आहे तर त्याच्याच हिंदी अनुवादात स्पष्टपणे धनगर असे छापले आहे. याचा अर्थ अनु. जमाती मंत्रालयाला धनगर आणि धनगड एकच असल्याचे मान्य आहे असा निष्कर्ष निघतो. त्याचप्रमाणे मंडल आयोग, कॅगनेही धनगर आणि धनगड एकच असल्याचे सांगितले आहे. याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे कि 'धनगड अशी जात कुठेही आढळत नाही. उत्तर प्रदेश सरकारने या विषयासाठी नेमलेल्या समीतीच्या अहवालावरुन असे दिसते कि धनगड आणि धनगर हे एकच आहेत. त्यामुळे यापुढे अनु. जातीचे (उत्तरप्रदेशात) दाखले देताना ते धनगराना द्यावेत, धनगडाना नव्हे'. राष्ट्रीय अनु. जाती आयोगाच्या 29 व्या मिटींगमधे (3-12-2012) आयोगाने धनगर-धनगड एकच असल्याचे मान्य केले. धनगर आरक्षणाला विरोध करण्यासाठी अनेक आदिवासी जमाती रस्त्यावर उतरल्या असताना त्यात धनगड जमातीची एकही व्यक्ती दिसू नये यातच सत्य काय ते ओळखावे. सरकारने जर धनगड जमातीचे स्वतंत्र अस्तित्व दाखवून ही धनगारांपेक्षा वेगळी जमात आहे असे सिद्ध केले तर धनगर आपले आंदोलन मागे घेतील. परंतु सरकारला हे सिद्ध करण्यात अपयश आले तर धनगरांची अनु. जमातीच्या आरक्षणाची मागणी मान्य करुन या उपेक्षित समाजाला न्याय द्यावा.
प्रकाश लालासाहेब पोळ,
कराड, सातारा
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment