Saturday, August 9, 2014

हर्षवर्धन पाटलांवर शाई आणि अजितदादांची घाई

अजित पवार
धनगर आरक्षणाचे आंदोलन ऐन भरात असताना हर्षवर्धन पाटलांवर शाई फेकण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. आरक्षण क्रुती समीती आणि सर्व समाजाने या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. कोणतीही मागणी लोकशाही प्रक्रियेच्या चौकटीत राहूनच करावी. त्यासाठी अर्ज-विनंत्या, मोर्चे, सभा हे मार्ग आहेतच. सरकारी, सामाजिक मालमत्तेचे नुकसान करणे, एखाद्या व्यक्तीला इजा पोहचवणे अशा प्रकारचे आंदोलन चुकीचे आहे. त्यामुळे सदर घटनेचा निषेध केलाच पाहिजे.


परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यानी यासंदर्भात तडकाफडकी पत्रकार परिषद घेऊन सदर प्रकार पूर्वनियोजित असल्याचा जावईशोध लावला. आंदोलकांची जर क्रूर थट्टा केली तर नैराश्यातून असे प्रकार याआधीही घडले आहेत. आणि ते अजिबात समर्थनीय नाहीत. मराठा आरक्षण आंदोलनात मुख्यमंत्र्यांच्या हेलीकोप्टरवर दगडफेक करण्यात आली होती. त्यावेळी अजित पवाराना हे पुर्वनियोजित षडयंत्र वाटले नाही. परंतू आत्ताच त्याना षडयंत्राचा वास यायला लागलाय. अजित पवारांचा राग आम्ही समजू शकतो. 2009 ला माढ्यात शरद पवाराना आणि 2014 ला बारामतीत सुप्रियाताई सुळेना महादेव जानकर यानी सळो कि पळो करुन सोडले होते. हे दोन्ही मतदारसंघ धनगरबहुल आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक धनगरानी या निवडनूकीत जानकराना मत दिले. सुप्रिया सुळे याना तर विजयासाठी अक्षरश: रडायला लावले. बारामतीसारख्या आपल्या बालेकिल्ल्यात नवखा आणि बाहेरचा उमेदवार आपणाला रडायला लावतो हे अजितदादांचे दुखणे आहे. त्यामुळेच मासाळवाडीसारख्या गावात जावुन दमबाजी करण्याचे प्रयत्न अजित पवारानी केले. 

अजित पवार हे एका जातीचे, एका जिल्ह्याचे मंत्री नाहीत. त्यानी  उपमुख्यमंत्री या नात्याने सर्व समाजाला समान महत्व दिले पाहिजे. परंतु धनगर समाजाने त्यांची राजकीय अडचण केल्यामुळे ते धनगरांवर चिडून आहेत ही बाब लपून राहिलेली नाही. त्यामुळेच शाई फेकण्याचा दुर्दैवी प्रकार घडताच धनगर समाज व त्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न त्यानी चालू केले. आंदोलकांपैकी एखाद्या-दुसर्याकडून चुकीचा प्रकार घडला तर त्यावरुन संपूर्ण आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न उद्वेगजनक आहेत.विरोधक कदाचित यात यशस्वी होतील. आणि धनगर आरक्षणाचा मुद्दाच बाजूला पडेल. निवडणूका झाल्यावर धनगरांवर सूड उगवण्याचे राजकारण पद्धतशिरपणे चालू होइल. धनगर समाज अजुन पन्नास वर्षे मागे जाईल. परंतू सुर्य उगवायचा कधी थांबत नसतो. एक ना एक दिवस धनगर समाजाचेही दिवस येतील. आमचे प्रयत्न, आमचा हेतू प्रामाणिक असल्यामुळे आम्हाला घाबरण्याचे कारण नाही. 

या शाईफेक प्रकरणानंतर टीव्ही, वर्तमानपत्रातून प्रतिक्रिया देणार्यांपैकी किती जण धनगर आरक्षणाचा प्रश्न समजाऊन घेण्यासाठी पुढे आले ? तुम्ही आमच्या मागणीला पाठींबा द्यावा असे आमचे म्हणने नाही. परंतू मुद्दा तर समजून घ्याल की नाही ? धनगर समाज जे म्हणतोय ते योग्य आहे का याचीतर शहानिशा करा. परंतु धनगर आरक्षणावर कधीही भुमिका न घेणारे दुटप्पी लोक आंदोलन चुकिचे आहे हे सांगण्यासाठी उतावीळ का? आणि धनगर समाजाला या स्पोंसर्ड लोकांच्या सर्टीफिकेटची अजिबात गरज नाही. धनगर सहनशील आहे. बारामतीत सहा लाख लोक जमले, मुंबईतही दोन लाख लोकानी गर्दी केली, सर्व जिल्ह्यात हजारो, लाखो लोकानी एकत्र येवुन मोर्चे काढले. एकाही ठिकाणी हिंसक प्रकार झाला नाही. अपवाद पंढरपूरजवळ बस जाळली गेली. लगेच आरक्षण क्रुती समीती आणि जानकर साहेबानी सांगितले कि जो हिंसा करेल तो आमचा कार्यकर्ता नाही. त्यामुळे आंदोलनाची दिशा अहिंसक आणि लोकशाही चौकट माणनारी आहे. एखाद्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहे.

प्रकाश लालासाहेब पोळ, कराड.
मोबा. 7588204128.

0 comments: