Saturday, August 9, 2014
धनगरांचा ओढा महायुतीकडेच का ?
गेली पासष्ट वर्षे धनगर समाज आरक्षणाची मागणी करतोय. त्यांचा प्रश्न समजून न घेता राज्यकर्त्यानी धनगरांची क्रूर चेष्टा केली. केंद्रात आणि राज्यात अपवाद वगळता कोंग्रेस आणि मित्रपक्षांची सत्ता आहे. त्यांच्या नेत्याना भेटून धनगर समाज आपली आरक्षणाची मागणी पटवून देतोय. परंतू झोपेचं सोंग घेतलेल्या राज्य सरकारला धनगरांचा प्रश्न सोडवण्याची इच्छा नाही. राजीव गांधींपासून ते शरद पवारांपर्यंत सर्व लोकाना धनगरांची मागणी योग्य आहे हे माहित आहे. परंतू फक्त आश्वासन देण्यापलीकडे या नेत्यांकडून काहीच झाले नाही.
धनगरांची मागणी घटनात्मक आहेत याचे शेकडो पुरावे दिले. गमतीची गोष्ट म्हणजे सरकार धनगर नेत्यांबरोबर मीटींगमध्ये ही मागणी योग्य असल्याचे सांगते. परंतू नंतर मात्र दुटप्पी भुमिका घेतं. जसे आरक्षण क्रुती समीती बरोबर झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्याना ही मागणी योग्य असल्याचा साक्षात्कार होतो, परंतू नंतर मात्र हे अशक्य असल्याचे दिसते. ही दुटप्पी भुमिका कशासाठी? मागणी अयोग्य असेल तर तसे सांगा. धनगरानाही झुलवत ठेवायचे आणि दुसर्या बाजुला आदिवासी समाजालाही प्रेशरखाली ठेवायचे ही सरकारची घाणेरडी नीति आहे. त्यामुळे सरकार आजपर्यंत धनगरांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षताच लावत आले आहे. त्यामुळे या सत्ताधारी आघाडीबद्दल धनगर समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
बारामतीत धनगर समाजातील सोळा तरुण उपोषणाला बसले. नऊ दिवस उपोषण चाललं. अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला. दुसरीकडे राज्यभर समाजाचे आंदोलन सुरुच होते. सत्ताधारी आघाडीचा एकतरी प्रमुख नेता उपोषणकर्त्याना भेटायला गेला का ? शरद पवार, प्रुथ्विराज चव्हाण, अजित पवार यांची आंदोलकाना भेटण्याची नैतिक जबाबदारी होती कि नाही ? धनगर समाजाच्या या प्रश्नावर सरकारने घेतलेली भुमिका खरेच चीड आणनारी आहे. आमची सोळा पोरं मरणाच्या दारात असताना त्याना किमान भेटण्याचं सौजन्य या लोकाना दाखवता येवू नये का ?
दुसरीकडे महायुतीने धनगरांचा हा राग ओळखून त्याना गोंजारण्याचे काम केले. महायुतीची सत्ता आल्यावर आरक्षण देण्याचे त्यानी मान्य केले. त्यामुळे धनगर समाजाने महायुतीला झुकते माप द्यायचे ठरवले. आणि हाच प्रकार काही लोकाना आवडला नाही. त्यानी आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा अपप्रचार करायला सुरुवात केली. सुरवातीपासून धनगर आरक्षणाला छुपा विरोध असणारेच यात अग्रभागी होते. जर धनगर समाजाने सत्ताधारी आघाडीवर विश्वास दाखवला असता तर याना चालले असते. कारण सत्ताधारी पक्ष so called पुरोगामी ना ? पण याना कुठे माहित आहे कि यांच्या पुरोगामित्वाची लक्तरे खैरलांजीच्या वेशीला टांगलीत ते. खर्डा गावातील नितीन आगेच्या हत्याकांडात अजित पवारांच्या आशीर्वादाने चालणार्या संघटनानी दलितविरोधी मोर्चा काढला. त्यामुळे सत्ताधारी आघाडी आणि पवार काका-पुतण्यानी पुरोगामीत्वाचा गजर बंद करावा. यांचे पुरोगामीत्व फक्त सोयीपुरते आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. सत्ताधार्यांच्या बगलबच्च्यानीही हे वास्तव समजुन घ्यावे. तुमची ढोंगं उघडी पडली आहेत.
प्रकाश पोळ, कराड.
मोबा. 7588204128
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment