Wednesday, August 20, 2014
धनगर आरक्षण - महाराष्ट्र टाईम्समधील लेखावर प्रतिक्रिया
19 ऑगष्ट च्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये समीर मणियार यांचा 'राखीव जागांचा येळकोट' हा लेख वाचला. सदर लेखात धनगर आरक्षणाबाबत चूकीची मांडणी केली आहे. त्यामुळे धनगरांच्या आरक्षण मागणीबद्दल गैरसमज पसरु शकतात. त्यामुळे ही दुसरी बाजू प्रसिद्ध करावी ही विनंती.
केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातीच्या मूळ यादीत महाराष्ट्रात 47 जमातींची नोंद आहे. (यातील दोन जमाती नंतर वगळण्यात आल्या आहेत) यात अनु. 36 वर oran, dhangad अशी नोंद आहे. यातील dhangad चा उच्चार धनगड, धांगड, धंगाद असा विविध प्रकारे होत असल्यामुळे सर्वांचाच गोंधळ झाला
आहे. या शब्दाचा नेमका उच्चार कसा करायचा याचे उत्तर अनुसूचित जमाती मंत्रालयाच्या वेबसाईट वर मिळू शकते. या वेबसाईटवर संबंधित मंत्रालयाचे वार्षिक अहवाल आहेत. या अहवालाच्या इंग्रजी प्रतीमधे dhangad असा शब्दप्रयोग असून त्याच्याच हिंदी भाषांतरामध्ये स्पष्टपणे 'धनगर' असा उल्लेख आहे. (वार्षिक अहवाल- 2008-09, 09-10) आणि हा उल्लेख केवळ महाराष्ट्रापुरताच नाही तर विविध राज्याच्या यादीत 'धनगर' अशीच नोंद आढळते. उदा. झारखंड (25)- उरांव, धनगर, ओरांव; महाराष्ट्र-(36) ओरान, धनगर; ओडिशा-(53) ओरांव, धनगर, उरांव. संबंधित अहवाल डाउनलोड करुन सर्वजण या बाबीची खातरजमा करु शकतात.
धनगड किंवा धांगड ही धनगरांपेक्षा वेगळी अशी जमात आहे असा काहींचा आक्षेप आहे. असे असेल तर काही प्रश्न उपस्थित होतात.
1. जर या जमाती अस्तित्वात असतील तर त्या नेमक्या कोणत्या प्रदेशात आहेत. त्यांची लोकसंख्या, संस्क्रुती, व्यवसाय या बाबी पुराव्यासहीत उजेडात यायला हरकत नाही.
2. गेली महिनाभर धनगर समजाचे या प्रश्नी तिव्र आंदोलन चालू असताना आणि धनगड/धांगड या जमाती अस्तित्वातच नाहीत अशी मांडणी ते करत असताना धनगड/धांगड जमात किंवा या जमातीतील एकही व्यक्ती का पुढे आली नाही.
3. छोटा नागपूर किंवा चंद्रपूर, गडचिरोली परिसरात धनगड/धांगड जमात अस्तित्वात असेल तर संबंधित राज्यांच्या अनु. प्रवर्गाच्या यादीत तशी नोंद नसून 'धनगर' अशी नोंद का आहे.
वरील प्रश्नाची पुराव्यासहीत उत्तरे कुणी दिली तर सत्य काय ते उजेडात येईल.
केंद्र सरकारने याआधी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीचा प्रस्ताव फेटाळला आहे अशी चुकीची मांडणी सातत्याने होत आहे. २६/०३/१९७८ रोजी महाराष्ट्र सरकारने धनगरांचा समावेश अनु. जमातीत करण्याबाबत शिफारस केली होती. ९/२/१९८१ रोजी केंद्र सरकारने यासंदर्भात म्हणणे मांडण्यास ७/३/८१ हि मुदत दिली. महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाचा सविस्तर अभ्यास करुन सदर अहवाल पाठवणे अपेक्षित होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकारने उत्तर तर दिलेच नाही, परंतु आपला मूळ प्रस्ताव कोणतेही कारण न देता मागे घेतला.
१९३१ मध्ये ब्रिटीश सरकारने केलेल्या जातनिहाय जन गणनेमध्ये 'ओरान' या जमातीची समकक्ष जमात म्हणून धनगर जमातीचा उल्लेख केला आहे. केंद्र सरकारच्या १९६१ च्या जनगणना अहवालात धनगर जमात अनुसूचित जमातीत समाविष्ठ असल्याचे म्हटले आहे. १९६८ साली केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या Bibliography of SC, ST & marginal tribes (पृष्ठ क्र. २९४) वर 'धनगर' (धनगड नव्हे) अनुसूचित जमात आहे असे नमूद केले आहे. १९८२ साली प्रसिद्ध केलेल्या याच ग्रंथाच्या आवृत्तीत 'धनगर' अशीच नोंद आहे. ८/४/१९८९ रोजी महालेखापालांनी धनगर समाजाचा अनु. जमातीत समावेश करण्याची शिफारस केली होती. केंद्र सरकारने नेमलेल्या मंडल आयोगाने धनगर आणि धनगड हे वेगळे नसून एकच असल्याचे आपल्या अहवालात नमूद केले आहे. दि. २२/१२/१९८९ रोजी खा. सूर्यकांता पाटील यांनी संसदेत महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेशाविषयी प्रश्न विचारला असता तत्कालीन मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले कि महाराष्ट्रातील धनगर समाज आधीपासूनच अनुसूचित जमातीत आहे. उत्तरप्रदेशच्या मुख्य सचिवानी २१/१०/२००८ रोजी सर्व जिल्हाधिकार्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे कि "उत्तर प्रदेश मध्ये फक्त धनगर जमातीचे अस्तित्व आढळते. 'धनगड' नावाची जमात राज्यात आढळत नाही . त्यामुळे धनगर समाजाचा अनुसूचित जातीत (उ. प्र. मध्ये) नव्याने समावेश करण्याची गरज नसून फक्त 'धनगड' ऐवजी 'धनगर' अशी दुरुस्ती करणे गरजेचे आहे." अलाहाबाद उच्च न्यायालयाने २००९ साली दिलेल्या निकालात म्हटले आहे, "धनगर हि उत्तरप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल मध्ये अनुसूचित जातीत मोडते तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये त्यांचा समावेश अनुसूचित जमातीत आहे." उत्तरप्रदेश मधील धनगर-धनगड वादाचा विचार करून सर्व अभ्यासांती राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने धनगर आणि धनगड एकच असल्याचे मान्य केले आहे. आणि अनुसूचित जातीचे दाखले धनगडांना न देता धनगरांना द्यावेत असा आदेश आयोगाने दिला आहे. (Minutes of 29th meeting of NCSC, ३/१२/२०१२).
धनगड-धनगर हे वेगळे नसून एकच असल्याचे शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. भारतीय संस्कृती कोश, The wild tribes of india (पृष्ठ ७८-७९), Tribal culture of India (पृष्ठ ११२), Some Indian tribes (पृष्ठ १३१-१३२), Society in tribal India (पृष्ठ २२), Phonology of Dhangar-kurux, Encyclopedia of the people of Asia & Oceania (पृष्ठ ६१३) अशा अनेक ग्रंथातून ओरान जमातीची समकक्ष जमात म्हणून धनगर आणि धनगड असे नोंदवले आहे.
धनगर समाजाचा अनुसूचित प्रवर्गात समावेश होण्यासाठी त्याना एक विशिष्ट प्रक्रिया पार पाडावी लागेल असा काहींचा सूर आहे. परंतु सदर प्रक्रिया ही अनुसूचित प्रवर्गात नव्याने समावेश होण्यासाठी आहे. धनगर समाजाचा समावेश नव्याने करायचा नसून फक्त अमलबजावणी करायची आहे. ही गोष्ट जरी केंद्र सरकारच्या अधिकारकक्षेत असली तरी त्यासाठी घटनादुरुस्तीची गरज आहे असे मला वाटत नाही.
धनगर समाजाच्या आंदोलनाबाबत दोन परस्परविरोधी प्रवाह आहेत. एक प्रवाह असा आहे कि शरद पवारानी राष्ट्रवादीचं पश्चिम महाराष्ट्रातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी निवडणूका डोळ्यापुढे ठेवून जाणीवपूर्वक या आंदोलनाला फुस दिली. दुसरा प्रवाह नेमका याच्या उलट आहे. काहीना वाटते कि संघ परिवार आणि भाजप, सेना सत्ता मिळवण्यासाठी धनगर आरक्षणाला बळ देत आहेत. आता आरक्षण प्रश्नावरुन राजकीय हवा तापलीय हे खरे आहे. परंतू एकाच वेळी हे आंदोलन शरद पवार आणि संघ परिवार कसे चालवू शकतात ? धनगर समाजाची लोकसंख्या आणि आंदोलनाचा होणारा राजकीय परिणाम लक्षात घेऊन सर्व पक्ष धनगराना पाठिंबा देताना दिसतात. परंतु एवढ्यावरुन ही मागणी पूर्णपणे राजकीय असून घटनाबाह्य आहे असा निष्कर्ष काढणे हे धनगर समाजावर अन्याय केल्यासारखे होईल. या समाजाने पहिल्यांदाच ही मागणी केलीय असेही नाही. 1960 पासून सातत्याने या समाजाने अर्ज-विनंत्या, निवेदने या माध्यमातून प्रयत्न चालू ठेवले आहेत. या प्रश्नात होणार्या राजकारणावर चर्चा होताना मूळ मुद्दा मागे पडून धनगर समाजावर अन्याय व्हायला नको हीच प्रामाणिक भावना आहे. सरकारने धनगर समाज आणि आदिवासी समाज दोघांची बाजू समजून घ्यावी आणि जे सत्य असेल त्याप्रमाणे निर्णय घ्यावा.
--प्रकाश लालासाहेब पोळ,
कराड, जि. सातारा.
मोबा. 7588204128, 9552616160
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comments:
धनगर समाज अस्टरॉसिटीत येतो का
Post a Comment