Friday, August 1, 2014

धनगरांच्या व्यथाना कवितेतुन वाट....निर्भय आझाद

आदिम परोपकाराची निशाणी- 
मेंढरं…! 
करतच राहिली 
आपल्या पवित्र खतामुताने 
पाटलाचं वावर पावन…! 
… 
मस्तवाल सरंजामशाहीची 
अनौरस औलाद- 
पाटील…! 
उलटतच राहिला भरल्या पोटाने…! 
गाभडतच राहिली समता 
वांझपणाचा भोग मिरवत…! 
… 

आज सुटलाय बांध 
बनाचा… 
भडकलाय पालनकर्ता, आजोबा- 
बिरोबा- 
लेकरांनो, 
हा आतबट्ट्याचा धंदा 
अजून किती काळ…? 
का मानताय 
पाटलाच्या भुवईला 
आपल्या जीवनकळपाच्या 
प्रवासाचे होकायंत्र…? 
… 
तोडा आता ही 
नीतीभितीची भोंगळ वाघर… 
घुमवा हिसाब-किताबाचा 
ढोल-कैताळ… 
उधळा यल्गाराचा भंडारा 
माखू दे आसमंत सारा… 
एकीच्या सूरात 
मांडा न्याय-हक्काचं सुंबरान…! 
… 
थांबू नका! 
जोपर्यंत… 
… 
न पटलेल्या पाटलाचा 
पराभव होत नाही तोपर्यंत… 

पिढ्यानपिढ्याची बाकी 
वसूल होत नाही तोपर्यंत… 

तुमच्या आत्मशक्तीची मल्हारज्योत 
तेवते आहे तोपर्यंत… 

-निर्भय आझाद

0 comments: