Saturday, August 2, 2014

धनगर आरक्षण लेखावर साप्ताहिक चित्रलेखाला पत्र

मा. संपादक,
साप्ताहिक चित्रलेखा.

महोदय,

11 ऑगस्ट 2014 च्या चित्रलेखा मध्ये संपादक द्न्यानेश महाराव यांचा 'धनगर-आदिवासी आरक्षणाची बारामती' हा लेख वाचला. सदर लेख एकांगी आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा वाटला म्हणून हा लेखनप्रपंच....या लेखात महाराव यानी काही मुद्दे उपस्थित केले आहेत.

1. महादेव जानकर याना आपणच धनगर समाजाचे एकमेव व ताकदवान नेते आहोत असे वाटते. त्याना बारामती लोकसभेला मिळालेली मतं ही मोदींच्या लाटेमुळे मिळाली आहेत.
--महादेव जानकर हे धनगर समाजाचे महत्वाचे नेते आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रात जानकर यांच्याव्यतिरिक्त धनगर समाजाचा एकही सर्वमान्य नेता नाही. जानकर यांची ताकद भलेही कमी असेल, परंतु संपूर्ण राज्यात त्याना मानणारा वर्ग आहे. धनगर आणि मागास बहुजन समाजाला बरोबर घेवुन जाणारा हा नेता आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात जानकर याना जवळजवळ साडेचार लाख मतं पडली. यात मोदी लाटेचा प्रभाव नक्कीच आहे. परंतु यात जानकरांचे काहीच कर्तुत्व नाही असा समज चुकीचा आहे. 2009 च्या  लोकसभेला जानकर यानी माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे शरद पवार आणि भाजपचे सुभाष देशमुख या तगड्या उमेदवारांविरुद्ध लाखभर मतं घेतली होती. जानकर यांचा काहीच वैय्यक्तिक करिश्मा नसता तर त्यांची अनामत रक्कम जप्त व्हायला हवी होती. जानकर एकटे लढत असताना गणपतराव देशमुख, प्रकाश आणि रमेश शेंडगे, अण्णा डांगे आदि धनगर नेते विरोधात असूनही जानकरानी मिळवलेली एक लाख मतं ही त्यांच्या लोकप्रियतेची आणि कर्तुत्वाची पोचपावतीच आहे.

2. धनगर समाजाचे आंदोलन बारामतीतच का? मुंबई, नागपूर, कराड, पूणे का नाही ? 
--बारामती हे महाराष्ट्राचे प्रमुख राजकीय केंद्र आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, 2009 च्या लोकसभा निवडणूकीत 'माढा' मतदारसंघातून लढत असताना शरद पवार यानी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात दिले होती. त्यामुळे धनगरबहुल माढा मतदारसंघातून शरद पवार आरामात निवडून आले. परंतू त्यानंतर त्यानी धनगर समाजाला दिलेले आश्वासन पाळले नाही. परिणामी आपली फसवणूक झाल्याची भावना धनगर समाजात निर्माण झाली. आजपर्यंत प. महाराष्ट्रातील धनगर समाज पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी कांग्रेस बरोबर राहिला आहे. परंतु पवार आपला वापर करुन नंतर तोंडाला पाने पुसत आहेत हे लक्षात आल्यामुळे निर्माण झालेल्या असंतोषातून बारामतीची निवड केली गेली. कारण दबाव टाकल्याशिवाय पवार बधणार नाहीत हे सर्वाना माहीत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे, बारामती आणि आजूबाजूच्या परिसरात धनगर समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, नागपूर, कराडपेक्षा बारामती आंदोलनासाठी सोयीचे ठिकाण होते.

3. एक मेंढरु पुढे निघालं कि त्याच्या मागे सगळी मेंढरं निघतात. तशाच पद्धतींने सर्वानी बारामती गाठली.
--प्रा. महाराव यांच्या लेखातील सर्वात खटकलेला हा मुद्दा आहे. धनगर समाज हा वर्षानुवर्षे मूक समाज म्हणून ओळखला जातो. या समाजाला मेंढरांची उपमा दिली जाते. यातून हा समाज निर्बुद्ध आहे असे सूचित करण्याचा उद्देश असतो. महाराव यांच्यासारख्या पुरोगामी, परिवर्तनवादी विचारवंताकडून ही अपेक्षा नव्हती. आंदोलनासाठी बारामतीच का ? याचे वरील विवेचन लक्षात घेतले तर धनगर समाज विचारपुर्वकच बारामतीत गेला हे लक्षात येईल. त्यामुळे अशा प्रकारे एखाद्या समाजाचा अपमानास्पद उल्लेख चित्रलेखाच्या समतेच्या भुमिकेला छेद देणारा आहे असे मला वाटते.

4. महादेव जानकर हे स्वत:च्या स्वार्थासाठी आणि महायुतीच्या फायद्यासाठी धनगर समाजाचा वापर करीत आहेत. त्याना खासदारकी हवी आहे.
--आजपर्यंत कांग्रेस/राष्ट्रवादीने धनगर समाजाचा वापर करुन घेतला. गेली पासष्ट वर्षे या समाजाच्या वाट्याला उपेक्षाच आली. महाराष्ट्रात एक कोटीच्या वर लोकसंख्या असणार्या या समाजाचे फक्त चार-पाच आमदार आहेत. या समाजाचा एकही खासदार किंवा मंत्री नाही. त्यामुळे सत्तेत वाटा मिळवण्यासाठी आपल्या समाजाला बरोबर घेवून वाटचाल करणे, राजकीय महत्वाकांक्षा बाळगणे हा जानकर यांचा अपराध आहे का ? याउलट जानकर जर कांग्रेस/ राष्ट्रवादीच्या वळचणीला गेले असते तरच ते योग्य, आणि त्यानी स्वतंत्र भुमिका घेतली (मग भलेही ती महायुतीकडे झुकणारी का असेना) तर मात्र ते स्वार्थी ही मांडणी एकांगी वाटते. जानकर अतिशय गरीब आणि अशिक्षित कुटुंबातून पुढे आले आहेत. आज त्यांचे जे काही स्थान आहे ते त्यानी गेली पंचवीस वर्षाच्या कष्टाने मिळवले आहे. त्यामुळे त्याना स्वतंत्र राजकीय भुमिका घेण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे.

5. धनगर समाज प्रगत आहे.
--आजही धनगर समाजात शिक्षणाचे प्रमाण अवघे 30-40% आहे. त्यातही उच्च शिक्षणाचे प्रमाण 5% पर्यंत आहे. राजकीय क्षेत्रात धनगरांचा सहभाग नगन्य आहे. सहकार क्षेत्रातही हा समाज दिसत नाही. या समाजाच्या शिक्षण संस्था, साखर कारखाने, दुध संस्था, प्रसारमाध्यमे नाहीत. या समाजात कुणीही उद्योगपती नाहीत. चार-दोन तालुक्यांचा अपवाद वगळता हा अल्प आणि अत्यल्प भुधारक समाज आहे. बहुतांशी लोक अजुनही पारंपरिक मेंढपाळीचा व्यवसाय करतात. या समाजाला अंधश्रद्धानी गुरफटले आहे. सामाजिक, सांस्क्रुतिक, राजकीय, आर्थिक आघाड्यांवर हा समाज कुठेही दिसत नाही. धनगर समाज प्रगत आहे असे म्हणताना या सर्व गोष्टींचा विचार करावा. प्रगती ही केवळ आर्थिक सुबत्तेवर मोजली जाते का ? आणि तीही केवळ चार-दोन तालुक्यातील? प्रगती मोजण्याचे इतर महत्वाचे निकष लावून पाहिले तर धनगर समाजाचा मागासपणा ठळकपणे नजरेत भरेल.

मी आजपर्यंत चित्रलेखाचा नियमीत वाचक आहे. पुरोगामी/परिवर्तनवादी भुमिका सडेतोड मांडणारे एकमेव नियतकालिक म्हणून आजही माझ्या मनात चित्रलेखा आणि द्न्यानेश महाराव यांच्याबद्दल आदर आहे. तरीही सदर लेख एकांगी वाटल्याने ही प्रतिक्रिया दिली. या लेखात माडलेल्या भुमिकेमुळे समाजात गैरसमज निर्माण होऊ शकतात त्यामुळे ही दुसरी बाजू चित्रलेखामध्ये प्रसिद्ध करावी ही विनंती.

         आ. वि.
प्रकाश लालासाहेब पोळ,
कराड, सातारा.
मोबा. 7588204128.