Wednesday, January 27, 2016

मराठी कविता - महाराजा यशवंतराव होळकर


भारत भूमीच्या रक्षणाची, केली ज्यांनी गर्जना
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।धृ।।

इंग्रजांना हरेक युद्धांत, ज्यांनी चारली हो माती
पळता भुई थोडी हे करती, इंग्रजांनी खाल्ली भीती
ज्यांच्या राष्ट्रकार्यामुळे, अभिमान वाटावा मना
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०१।।

होळकरी काव्याने हे, महाराजा झुंजले किती
होळकरी बांडा झेंडा ज्यांनी, गाजविला भारती
ज्यांच्या पराक्रमापुढे झुकती, अजुनी सर्व माना
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०२।।

एकाकी झुंजले परी, कधी नाही हार मानिली
सदा तलवारीच्या टोकावर, ज्यांनी आव्हाने पेलली
शिकवण ज्यांची सदा होती, ठेवा ताठ पाठीचा कणा
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०३।। 

देशभक्तीमुळे इतिहासात जे, अजरामर हो झाले
स्वातंत्र्याची प्रथम ठिणगी जे, मनी पेटवूनी गेले
ही स्तुतिसुमने वाहतो, मिलिंद ज्यांच्या चरणां
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०४।।​

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)

'आम्ही धनगर' या कवितासंग्रहातून…