Wednesday, January 14, 2015

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर..तमाम बहुजन समाज बांधवांचं स्फुर्तीस्थान..

अहिल्यामातेच्या गौरवशाली इतिहासानं धनगरांची छाती अभिमानाने फुलुन जाते. अहिल्यामातेनं अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत सर्व धार्मिक रूढी परंपरांना छेद देत तब्बल तीन दशके न्यायाचं आणि समतेचं राज्य करून तमाम राज्यकर्त्यांसमोर एक वेगळा आदर्श घालून दिला. अहिल्यामातेच्या इतिहासातील प्रत्येक प्रसंग पुढील राज्यकर्त्यांसाठी प्रमाण ठरला. मगं त्यांनी राबवलेली सात-बारा पध्दत असो कि पांढऱ्या घोंगडीवर बसून दिलेला न्याय असो..अहिल्यामातेनं देशभरातील कित्येक
भग्न अन् जीर्ण मंदिरांचा जिर्णोध्दार करून श्रद्धा आणि उपासनेचा राजधर्म निभावण्याचे ऐतिहासिक कार्यही केले. कित्येक नद्यांवर घाट बांधले, धर्मशाळा उभारल्या, गोरगरीब जनतेसाठी अन्नछत्रे सुरु केली. राज्यकर्त्या म्हणुन आपल्या अतुलनीय कार्याने सर्वसामान्य जनतेसाठी त्या माता झाल्या. हे लोकोपयोगी कार्य करत असतानाचं प्रसंगी घोड्याला टाच मारून हातातील तलवारीनं रयतेच्या राज्यावर चालून आलेल्या अनेक संकटांवर त्यांनी धैर्याने व हिकमतीने यशस्वी मात केली. अहिल्यामाता युद्धनितीमध्ये निपुण होत्या. त्यांची निर्णयक्षमता अचूक व दुरदृष्ट्रीचा विचार करणारी होती हे आपणांस "राघोबा स्वारी"वरुन लक्षात येते. अहिल्यामातेचा इतिहास तमाम धनगरांसाठी स्फुर्ती आणि चांगल्या कामासाठी प्रेरणा देण्याचे काम करतो. याच अहिल्यामातेच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा तमाम धनगर बांधवांसाठी अनमोल असाचं ठेवा आहे. पुण्यश्लोक अहिल्यामातेचे आपण सर्वजण पुत्र आहोत. आपल्याही हातून ऐतिहासिक कार्य घडण्यासाठी आपणांस अहिल्यांमातेच्या विचारांची साथ मिळणार आहे. कुठलंही काम श्रेयासाठी करू नका. नदी यासाठी वाहत नाही कि कुणीतरी माझं पाणी प्यावं, कुणाला माझ्या पाण्याचा उपयोग व्हावा आणि त्यांचं श्रेय मला मिळावं..तर यासाठी वाहते की वाहणे हा तिचा धर्म आहे. आपल्यासाठी देखील "चांगलं काम" हा धर्म व्हावा आणि आपल्या हातून देखील अधिकाधिक चांगली कामे व्हावीत हीचं अपेक्षा आणि आपल्या अविरत सामाजिक कार्यास माझ्या मनपुर्वक शुभेच्छा..

हरिश आदिनाथ कडु, प्रदेश प्रवक्ता, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती..!!

0 comments: