Thursday, July 31, 2014

धनगरांच्या आरक्षणाला घटनात्मक यंत्रणांचा आधार

सध्या धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण मागणीवरून वातावरण चांगलेच तापले आहे. धनगरांना अनुसूचित जमातीचा दर्जा द्यावा म्हणून या समाजाने तीव्र आंदोलन छेडले आहे. दुसरीकडे धनगरांच्या या मागणीला विरोध करत आदिवासी समाजही रस्त्यावर उतरला आहे. या पार्श्वबुमीवर एकूणच धनगर समाजाची आरक्षण मागणी आणि त्याबाबत असणार्या घटनात्मक तरतुदी याचा उहापोह करणे गरजेचे ठरते.

कोणत्याही समाजाला आदिवासी ठरवण्यासाठी काही निकष विचारात घेतले जातात.
१. आदिम अस्तित्व- धनगर ही आदिम जमात आहे हे इंथोवेन, रसेल, इरावती कर्वे, रा. चि. ढेरे आदी मानववंश शास्त्रज्ञ/ समाजशास्त्रज्ञानी सिद्ध करून दाखवले आहे. अगदी आर्यपूर्व काळापासून हा समाज मेंढपाळीचा निमभटका व्यवसाय करत आहे. महाभारत काळापासूनचे धनगर समाजाचे अस्तित्व अनेकांनी सिद्ध करून दाखवले आहे. आजही धनगर समाज हाच व्यवसाय करतो.
२. स्वतंत्र संस्कृती- धनगरांची वैशिष्ट्यपूर्ण अशी स्वतंत्र संस्कृती आहे. धनगरांचे देव-देवता, कुळाचार, प्रथा-परंपरा हे नागर समाजापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. बिरोबा, सुराप्पा, मायाक्का हे धनगरांचे प्रमुख देव आहेत. मुगार, अंधारबोन, पात्रे भरणे, वालुक, हेडाम, ईर (वीर), घुगुळ, दुध शिजवणे, सवाष्णी अशा प्रकारचे आदिम खाणाखुणा असणारे सण धनगर समाज आजही साजरे करतो. हे सण इतर कोणत्याही जातीत आढळत नाहीत. नागर समाजाप्रमाणे धनगरांच्यात ब्राह्मण किंवा गुरव हे पुजारी नसतात. आदिवासिंप्रमाणे धनगरांचे स्वतंत्र पुजारी असतात जे त्याच समाजातून निवडले जातात. त्यांना 'गावडा' असे म्हणतात. आदिवासिंप्रमाणे धनगर समाजाची स्वतंत्र लोककला (गजी नृत्य व धनगरी ओवी) आहे. प्रा. गुंथन सोन्थायमर या अभ्यासकाने धनगरांची ही लोककला आदिम असून त्यांच्या आदिवासी जीवनशैलीतून निर्माण झाल्याचे दाखवून दिले आहे.
३. स्वतंत्र भौगोलिक अस्तित्व- धनगर समाजाच्या मेंढपाळ व्यवसायामुळे या समाजाला निमभटके स्वरूप आले आहे. हा समाज मेंढरामागे भटकत असताना रानोमाळ, डोंगरकपाऱ्यात राहणे भाग पडते. या समाजाची वस्ती बहुतांशी प्रमाणात स्वतंत्र ठिकाणी असून ती शक्यतो माळरानावर आढळते.
४. बुजरेपणा-धनगर समाज शतकानुशतके 'मूक समाज' म्हणून ओळखला जातो. धनगरांचे संपूर्ण आयुष्य मेंढरामागे रानात, डोंगरात जात असल्याने नागरी जीवनात हा समाज पूर्णपणे समरस होताना दिसत नाही. आजही धनगर पाड्यांना भेट दिली असता या समाजाचा बुजरेपणा ठळकपणे नजरेत भरतो.
५. मागासपणा-धनगर समाज अतिशय मागास आहे. या समाजात शिक्षणाचे प्रमाण केवळ ३० % आहे. त्यातही उच्च शिक्षणाचे प्रमाण २-५ % आहे. हा समाज अल्पभूधारक आहे. कालेलकर आयोगाने धनगर समाजाचा विशेष उल्लेख करून (त्यातील सर्व पोटजातीसह) हा समाज 'अतिमागास' असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.

धनगर समाज हा प्राचीन काळापासून आदिवासीच आहे हे रसेल, इंथोवेन, इरावती कर्वे आदींनी सिद्ध केले आहे. The Tribes & Castes of Bombay (खंड १ ) मध्ये इथोवेन ने स्पष्टपणे नोंदवून ठेवले आहे कि धनगर आदिवासीच आहेत.  Encyclopedia of Scheduled Tribes in India  या ग्रंथात पी. के. मोहंती यांनी धनगर ही पश्चिम भारतातील आदिवासी जमात असल्याचे म्हटले आहे. Resource development in tribal India या पुस्तकात एस. के. शर्मा यांनी ओरान या जमातीला उरान, धनगर, धाका, किसान या नावानेही ओळखले जात असल्याचे नमूद केले आहे. The tribes & castes of the central provinces of India  (खंड १ आणि २) मध्ये रसेलने धनगर हि आदिवासिंप्रमाणे स्वतंत्र संस्क्रती असणारी आदिम जमात आहे हे सप्रमाण दाखवून दिले आहे.

धनगर आरक्षणाबाबत संविधानातही अनुसूचित जमातीची तरतूद आहे. केंद्राने जी अनुसूचित जमातीची यादी प्रसिद्ध केली आहे त्यात महाराष्ट्रात ४७ जमातींचा समावेश आहे. त्यामध्ये अनु. ३६ वर ओरान, धनगड अशी नोंद आहे. याबाबत धनगर समाजाचे म्हणणे आहे कि धनगड म्हणजेच धनगर आहे. धनगड-धनगर हि टंकलेखनातील चूक नसून तो भाषिक भेद आहे. उदा. ओरिसा-ओडीसा, एकर-एकड इ. धनगर समाजाचा अनु. जमातीत नव्याने समावेश करावा अशी मागणी नसून जी घटनात्मक तरतूद आहे तिची फक्त अंमलबजावणी करावी अशी मागणी आहे.


धनगड-धनगर हे वेगळे नसून एकच असल्याचे शेकडो पुरावे उपलब्ध आहेत. भारतीय संस्कृती कोश, The wild tribes of india (पृष्ठ ७८-७९), Tribal culture of India (पृष्ठ ११२), Some Indian tribes (पृष्ठ १३१-१३२), Society in tribal India  (पृष्ठ २२), Phonology of Dhangar-kurux, Encyclopedia of the people of Asia & Oceania (पृष्ठ ६१३) अशा अनेक ग्रंथातून ओरान जमातीची समकक्ष जमात म्हणून धनगर आणि धनगड असे नोंदवले आहे.

१९३१ मध्ये ब्रिटीश सरकारने केलेल्या जातनिहाय जन गणनेमध्ये 'ओरान' या जमातीची समकक्ष जमात म्हणून धनगर जमातीचा उल्लेख केला आहे. १९६८ साली केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या Bibliography of SC, ST & marginal tribes (पृष्ठ क्र. २९४) वर 'धनगर' (धनगड नव्हे) अनुसूचित जमात आहे असे नमूद केले आहे. १९८२ साली प्रसिद्ध केलेल्या याच ग्रंथाच्या आवृत्तीत 'धनगर' अशीच नोंद आहे. केंद्र सरकारच्या १९६१ च्या जनगणना अहवालात धनगर जमात अनुसूचित जमातीत समाविष्ठ असल्याचे म्हटले आहे. २६/०३/१९७८ रोजी महाराष्ट्र सरकारने धनगरांचा समावेश अनु. जमातीत करण्याबाबत शिफारस केली होती.  ९/२/१९८१ रोजी केंद्र सरकारने यासंदर्भात म्हणणे मांडण्यास ७/३/८१ हि मुदत दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकारने उत्तर तर दिलेच नाही, परंतु आपला मूळ प्रस्ताव कोणतेही कारण न देता मागे घेतला. Census of India occasional paper I of 1982 (Bibliography on Scheduled Castes & Scheduled Tribes) या शासनाच्या पुस्तकातही पृष्ठ क्र. ८७ वर DHANGAD, DHANGAR असे शीर्षक देवून दोन्ही शब्द एकच दर्शवून दोन्हीसाठी समकक्ष माहिती दिलेली आहे. २८/४/१९८९ रोजी महालेखापालांनी धनगर समाजाचा अनु. जमातीत समावेश करण्याची शिफारस केली होती.

केंद्र सरकारने नेमलेल्या मंडल आयोगाने धनगर आणि धनगड हे वेगळे नसून एकच असल्याचे आपल्या अहवालात नमूद केले आहे. दि. २२/१२/१९८९ रोजी खा. सूर्यकांता पाटील यांनी संसदेत महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेशाविषयी प्रश्न विचारला असता तत्कालीन मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले कि महाराष्ट्रातील धनगर समाज आधीपासूनच अनुसूचित जमातीत आहे. उत्तरप्रदेशच्या मुख्य सचिवानी २१/१०/२००८ रोजी सर्व जिल्हाधिकार्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे कि "उत्तर प्रदेश मध्ये फक्त धनगर जमातीचे अस्तित्व आढळते. 'धनगड' नावाची जमात राज्यात आढळत नाही . त्यामुळे धनगर समाजाचा अनुसूचित जातीत (उ. प्र. मध्ये) नव्याने समावेश करण्याची गरज नसून फक्त 'धनगड' ऐवजी 'धनगर' अशी दुरुस्ती करणे गरजेचे आहे." अलाहाबाद उच्च न्यायालयाने २००९ साली दिलेल्या निकालात म्हटले आहे, "धनगर हि उत्तरप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल मध्ये अनुसूचित जातीत मोडते तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये त्यांचा समावेश अनुसूचित जमातीत आहे."  उत्तरप्रदेश मधील धनगर-धनगड वादाचा विचार करून सर्व अभ्यासांती राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने धनगर आणि धनगड एकच असल्याचे मान्य केले आहे. आणि अनुसूचित जातीचे दाखले धनगडांना न देता धनगरांना द्यावेत असा आदेश आयोगाने दिला आहे. (Minutes of 29th meeting of NCSC, ३/१२/२०१२).  अनुसूचित जमाती मंत्रालयाच्या २००८-०९ आणि ०९-१० या वर्षीच्या वार्षिक अहवालात इंग्रजी प्रतीमध्ये 'dhangad' असे छापले असून त्याच्याच हिंदी अनुवादात स्पष्टपणे 'धनगर' असे छापले आहे. याचा अर्थ अनु. जमाती मंत्रालयालाही धनगड-धनगर एकच असल्याचे मान्य आहे असे दिसते.

 या सर्व पुराव्यांवरून हे स्पष्ट होते कि महाराष्ट्रातच काय इतर कोणत्याही राज्यात 'धनगड' जमातीचे स्वतंत्र अस्तित्व नसून धनगरांनाच 'धनगड' असे संबोधले आहे. त्यामुळे धनगड-धनगर असा शब्दछल न करता धनगर समाजाला अनु. जमातीचे घटनात्मक आरक्षण द्यायला हरकत नसावी

प्रकाश लालासाहेब पोळ,
कराड, सातारा.

0 comments: