डॉ. संतुजी रामजी लाड हे एक थोर
समाजसेवक व नेते होते. महात्मा ज्योतिबा फुले तसेच महर्षि विठ्ठल रामजी
शिंदे यांच्या सोबत त्यांनी मोलाचे समाजकार्य केले. डॉ. संतुजी लाड यांच्या
जीवनकार्यांचा घेतलेला हा एक संक्षिप्त आढावा;
इ.स.
१८४१ मध्ये एका खाटीक-धनगर कुटुंबात जन्मलेल्या संतुजी यांनी ठाण्याच्या मिशनरी
शाळेत आपले शिक्षण घेतले. त्यानंतर डॉ. कीर्तीकर यांच्याकडे त्यांनी
वैद्यकशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला व एक निष्णात डॉक्टर बनले. डॉ.
संतुजी लाड यांच्या जीवनाचा अभ्यास करताना त्यांचा 'सत्यशोधक समाज' आणि
'भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळ' यांच्याशी आलेला संबंध व त्या
माध्यमांतून त्यांनी केलेले समाजकार्य यांचा प्रामुख्याने विचार करावा
लागतो.
डॉ. संतुजी लाड आणि सत्यशोधक समाज :
डॉ.
संतुजी लाड यांच्या जीवनावर कायम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा
प्रभाव राहिला. त्याच विचारांमुळे डॉ. संतुजी लाड सत्यशोधक समाजाकडे
आकर्षिले गेले आणि पुढे सत्यशोधक समाजाचे एक आघाडीचे नेते बनले. महात्मा
ज्योतिबा फुले यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्षे समाजकार्य केले. सत्यशोधक
समाजाच्या इ.स.१८८५ च्या ठाणे येथील वार्षिक उत्सवात त्यांनी सक्रिय सहभाग
घेतला होता. नाशिक येथे इ.स.१९१२ साली भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या दुसऱ्या
परिषदेचे ते अध्यक्ष होते. फुले यांच्या उपदेशाची सत्यता, उपयुक्तता व
आवश्यकता यांचा आपल्यावर प्रभाव पडला व त्यानुसार आपण वर्तन करतो, असे
त्यांनी म्हटले होते. ठाणे येथे झालेल्या सत्यशोधक समाजाच्या तिसऱ्या
अधिवेशनाचा खर्च डॉ. संतुजी लाड यांनी केला होता. 'दीनबंधू' ह्या साप्ताहिक
मुखपत्र त्याकाळी चालविले जात असे. पण काही आर्थिक कारणांनी ते डबघाईला
आले. त्यावेळी 'दीनबंधू' या वृत्तपत्राला त्यांनी आर्थिक मदत करून हे
वृत्तपत्र बंद पडू दिले नाही. 'दीनबंधू' हे साप्ताहिक मुखपत्र पुन्हा
नव्याने सुरु झाले, पण त्यासाठीं डॉ. संतुजी लाड यांना आपली सर्व संचित
संपत्ति खर्चावी लागली होती. 'दीनबंधू'ने इ.स.१८९६ च्या २३ फेब्रुवारीच्या
अंकात डॉ. संतुजी लाड यांचा 'प्रथम-भाषणकार' असा उल्लेख केला होता.
डॉ. संतुजी लाड आणि भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळ:
महर्षि
विठ्ठल रामजी शिंदे यांनी विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यांसाठी
स्थापन केलेल्या भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळामध्ये डॉ. संतुजी लाड हे
एक महत्त्वाचे मार्गदर्शक व साहाय्यकारी होते. तसेच मंडळाच्या पाच आद्य
संस्थापकांपैकी डॉ. संतुजी लाड हे एक होते. त्या पाच ही संस्थापकांची नावे व
पदे पुढीलप्रमाणे ; १. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे (सरचिटणीस), २. सर
नारायण चंदावरकर (अध्यक्ष), ३. शेठ दामोदरदास सुखडवाला (उपाध्यक्ष), ४.
नारायणराव पंडित (खजीनदार) आणि ५. डॉ. संतुजी रामजी लाड (अधीक्षक). भारतीय
निराश्रित साह्यकारी मंडळ अनेक सामाजिक तसेच प्रबोधनात्मक उपक्रम चालवत
असे, त्याचाच भाग म्हणून मंडळाने इ.स. २२ नोव्हेंबर १९०६ ते इ.स.१९०८ च्या
अखेर पर्यंत परळ येथे एक मोफत दवाखाना चालवला होता. या दवाखान्यात डॉ.
संतुजी लाड स्वतः रोज सकाळी ठाण्याहून स्वखर्चाने येत असत. त्यासाठीचा
प्रवासखर्चही ते कधी मंडळाकडून घेत नसत. अस्पृश्तेचे प्रमाण त्या काळात
अधिक होते. अस्पृश्य वर्गातील रोग्याला डॉक्टर साधे शिवूनही घेत नसत. पण
त्या काळात डॉ. संतुजी लाड अस्पृश्य रोग्याला शिवून, अतिशय प्रेमळपणाने
त्याची तपासणी करीत असत व उपचार करुन औषध देत असत. डॉ. संतुजी लाड यांच्या
सेवावत्तीबद्दल व त्यांनी केलेल्या साहाय्याबद्दल महर्षि विठ्ठल रामजी
शिंदे यांना फार कृतज्ञता वाटत होती. डॉ. संतुजी लाड ह्यांच्या जोडीने डॉ
एस.पी.नाशिककर हे ही मंडळाच्या दवाखान्याचे काम पाहत असत. डॉ. संतुजी लाड
केवळ दवाखान्यातच उपचार करत असत असे नव्हते, तर ते आजूबाजूच्या गरीब
वस्तीतील घरांमध्ये जाऊन गरीब रोग्यांना मोफत औषधोपचार देखील करत असत. या
वैद्यकीय कार्यांव्यतिरिक्त डॉ. संतुजी लाड यांनी ठाणे येथे रात्रीची
शाळाही चालवली होती.
डॉ.
संतुजी लाड हे दीनदुबळ्यांना मदत करायला सदैव तत्पर असत. स्वभावाने अतिशय
प्रेमळ असणारे डॉ. संतुजी लाड कोणीही संकटांत सापडला असे कळले की, त्याच्या
साहाय्यासाठी धावत असत. आपल्या संपत्तीचा उपयोग त्यांनी सार्वजनिक
कामासाठी व गोरगरिबांच्या साहाय्यासाठीच केला. पंढरपूर ऑर्फनेजमधून त्यांनी
दोन मुली समाजाकडून मागून घेतल्या व त्यांचें प्रतिपालन करून त्यांची
लग्नेंही लावून दिली. सेवानिवृत्ती नंतरच्या काळात देखील मुंबई येथील मराठा
प्लेग हॉस्पिटलमध्ये 'हाऊस-सर्जन' म्हणून त्यांनी काम केले. प्लेग
हॉस्पिटलांत संपर्कात आलेल्या एका मुलाचे त्यांनी स्वतः उत्तम रीतीने
संगापेन केले होते. अत्यंत निस्वार्थीपणाने समाजाची शेवटपर्यंत सेवा
करणाऱ्या डॉ. संतुजी लाड यांचे कार्य वाखाण्याजोगेच आहे. अशा ह्या थोर
समाजसेवकाचे इ.स. १९१६ च्या अखेरीस पक्षाघाताच्या विकाराने निधन झाले.
डॉ.
संतुजी लाड यासारख्या एका निस्वार्थी थोर समाजसेवकाचे कार्य आपणां
सर्वांपर्यंत पोहोचावे एवढीच हा लेख लिहिण्यामागील माफक अपेक्षा !
- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
www.milind-dombale.blogspot.com
संदर्भ -
१. Website - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई प्रस्तुत : महर्षि विठ्ठल रामजी शिंदे - समग्र साहित्य
२. Website - Prabodhankar K S Thackeray's Life & Literature, Official Website
३. Book - 'Shahu Chhatrapati : A Royal Revolutionary' (1976) By Dhananjay Keer
४. Book - Jotirao Phule (1996) By Tarkteerth Laxmishastri Joshi, Daya Agarval
५. Book - 'Non-Brahman Movement In Maharashtra' (1989) By M.S.Gore
6 comments:
युगप्रवर्तक अग्रणी समाजसेवक खटीक धनगर समाज गौरव डॉ सन्तु जी लाड़ के बारे में जानकारी प्राप्त कर अभिभूत हुआ, ऐसे महापुरुषों के बारे में उच्च प्राथमिक स्तर के विद्यार्थियों को और समस्त समाज को जानकारी देनी चाहिए, डॉ सन्तु जी लाड़ के बारे में जानकारी देने के अखिल भारतीय खटीक समाज के अध्यक्ष श्री नेतराम ठगेला सर का मैं हृदय के अन्तरतल से आभारी हूँ, मैं लेखक श्री मिलिंद डोम्बाले देशमुख का भी प्रामाणिक जानकारी पूर्ण लेख के लिए हृदय से आभार प्रकट करता हूँ, #वीबी जैन, पत्रकार, सलाहकार, अध्यक्ष, जनशक्ति विकास फाउंडेशन, सी 47 एम 56 के सामने, महेश कॉलोनी, टोंक फाटक, जयपुर(राजस्थान) पिन 302015 मो न 9261640571 9314624151
Great person...
ऐसे महान खटीक शख्सियत की जानकारी देने के लिए बहुत बहुत आभार।
ही माहिती प्रत्येक स्तरावर पोहचवली पाहिजे ,
ऐसे थोर पुरुष की जितनी तारीफ की जाये इतनी कम है इसकी दखल सरकार ने लेनी चाहिये
खूप महत्वाची माहिती समाज बांधवांनी आत्मसात केले पाहिजे व ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवली पाहिजे
Post a Comment