Wednesday, September 9, 2015

Sri Sant Ramjibaba (श्री संत रामजीबाबा)


पुणे शहराच्या लगतच चिंचवड गावापासून अगदी जवळच असलेल्या चांदखेड ता. मावळ या गावी पेशवाईचे काळात धनगर (खाटीक) या समाजात रामजीबाबा नावाचे एक संत पुरुष होऊन गेले. रामजीबाबांचा व्यवसाय म्हणजे मेंढरांचे पालन-पोषण करणे हा पिढीजात धंदा होता. खंडोबाची उपासना त्यांच्या घराण्यात परंपरेने चालू होती. त्या उपसनेमधूनच त्यांच्या ठिकाणी असे काही वैराग्य निर्माण झाले की, संसारी असून देखील ते विरागी बनले. प्रभूचिंतनात त्यांचा सर्व काळ जात असे व चिंतनामधूनच त्यांना ईश्वर प्राप्ती झाली.

रामजीबाबा हे चांदखेड गावातील घोलप घराण्यातील. घोलप घराणे खंडोबाचे भक्त होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील चांदखेड या गावीच झाला. रामजीबाबांचा संसार मावळ तालुक्यातच होता. त्या भागातील लोकांना वाटले की, संत तुकारामांनंतर हा एक त्यांच्याच मार्गाने जाणारा कोणीतरी दिव्य साधुपुरुष आपल्यामध्ये आवतरला आहे. त्यामुळे तेथील लोक बाबांच्या भजनी लागले. रामजीबाबांनी त्यांच्या आयुष्यात काही चमत्कार केल्याचे दाखले नाहीत. परंतु एकही चमत्कार न करतां देखील केवळ भक्तीमार्गांमुळे हजारो लोक त्यांच्या भजनी लागले होते.

रामजीबाबांनी तुकाराम महाराजांचे प्रमाणेच प्रपंच साधून परमेश्वाची सेवा व आराधना केली. रामजीबाबांची ओळख त्यावेळच्या समाज बांधवांना पटली नाही. परंतु समाजाच्या अत्यंत कठीण अवस्थेत त्यांनी लोकांना धीर दिला व भक्तीमार्गाने संकटाला सामोरे जाण्याचे शिकवले. काही लोकांनी त्यांची अवहेलना केली परंतु संताना देखील काही काळ अनुकूल असावा लागतो. त्या काळात अनेक संत महात्मे होऊन गेले. रामजीबाबा हे खंडोबाचे परमभक्त म्हणून ओळखले जावू लागले. समाजाला मार्गदर्शन करुन त्यांनी खंडोबाची भक्ती करण्याचा उपदेश केला.

रामाजीबाबा यांनी चांदखेड या गावीच आपला देह ठेवला व ते वयाच्या ५४ व्या वर्षी खंडोबाचे चरणी विलीन झाले. तो दिवस म्हणजे पौष शुध्द पौर्णिमेचा होता. दरवर्षी या तिथीला रामजीबाबांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरी केली जाते. महाराष्ट्रात शेकडो भक्त त्याठिकाणी जमतात. भजन, कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेतात. मुंबई येथील सर्वश्री बेंद्रे, खराटे, घोणे, घोडके या घराण्यातील लोक मोठ्या संख्येने येवून हा पुण्यतिथीचा सोहळा पार पडतात. समाजातील बाबांच्या भक्तांनीच चांदखेड येथील समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करुन भव्य सभा मंडप उभारला आहे.

अशा थोर संताचे चरणी आमचे विनम्र अभिवादन -  
पवित्र जे कुळ पावन तो देश । जेथे हरिचे दास जन्म घेती ।। 
कर्म धर्म त्याने झाला नारायण । त्याचेचि पावन तिन्ही लोक ।।  

संकलन - मिलिंद डोंबाळे (देशमुख) 
www.milind-dombale.blogspot.com 
(टिप - सदरचा लेख मी लिहिला नसून, एका जुन्या पुस्तकात तो प्रकाशित झाला होता व ते पृष्ठ फक्त माझ्या हातीं लागले. प्रयत्न करुनही लेखक व पुस्तकाचे नाव कळू शकले नाही. जर कोणास लेखक किंवा पुस्तकासंबधी काही माहिती असल्यास जरुर कळवावे)

0 comments: