Wednesday, May 31, 2017

मराठी कविता - ​धनगर​पुत्र आद्य चक्रवर्ती​ ​सम्राट चंद्रगुप्त मौर्य ​ ​


। सम्राट चंद्रगुप्त मौर्य । मराठी कविता । मिलिंद डोंबाळे (देशमुख) ।
। Samrat Chandragupta Maurya । Marathi Kavita । Milind Dombale (Deshmukh) ।


Saturday, January 14, 2017

यंत्रमानव व कृत्रीम प्रज्ञेचे आव्हान!

Image result for artificial intelligence

समाज कसा असणार हे समाजात बुद्धीवंत, प्रज्ञावंत किती अहेत व ते कोणत्या दिशेने विचार करतात यावर जेवढे अवलंबुन असते तेवढेच ते अन्य राष्ट्रे कोणत्या दिशेने प्रगती करत जातात यावरही अवलंबुन असते. परकीय प्रभावाने समाजाची दिशा ठरने अनेकदा अडचणीचे असते कारण मुळात त्यांच्या प्रगतीचा मुलगाभा न समजताच अनुकरणातुन ही दिशा नाइलाजाने स्विकारावी लागत असते. आपल्याला तसे होणे परवडणारे नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

प्रगत राष्ट्रांत सध्या जोरदार चर्चा चालु आहे ती श्रमिकांची व कनिष्ठ कार्यांसाठी लागणा-या कर्मचा-यांची जागा यंत्रमानवांनी घेणे कितपत संयुक्तिक व नैतिक आहे यावर. औषधी उत्पादन, शेतकी ते अनेक रसायनी उद्योगांत अवाढव्य कारखाने यंत्रमानवांच्या वापराला पसंती देतांना दिसून येतात. काहींनी त्यांचा वापर सुरुही केला आहे. त्यात आता भर पदली आहे ती म्हणजे "कृत्रीम बुद्धीमत्ता" (Artificial Intelligence) या वेगाने विकसित होत चाललेल्य संकल्पनेची. येथे मानवी मेंदुची जागाच संगणक कसे घेतील याचा प्रयत्न सुरु आहे. संगणक सध्या माहितीचे विश्लेशन करतो पण निर्णय घेत नाही. आवाज ऐकुन त्याचे भावात्मक विश्लेषन करत नाही. वासही घेऊ शकत नाही कि पर्यावरणीय बदलांना प्रतिसादही देत नाही. विचार करणे हे मानवाचे महत्वाचे वैशिष्ट्य. पण सध्याचे संगणक विचार करु शकत नाही. 

पण संगणकांनी तसे करावे...किंबहुना संगणकांनी मनुष्याचीच जागा घ्यावी यासाठी प्रयत्न होत आहेत. यासाठी पुंजयामिकीय संगणकप्रणाली (Quantum mechanic based system) बनवता येईल अशी संकल्पना मी १९९८ साली बेंगलोर येथे एका कार्यशाळेत मांडली होती. हे काम माझ्या हातून झाले नसले तरी आता जगात याही दिशेने प्रयत्न सुरु आहेत व त्याला कधी ना कधी यश मिळेल यातही शंका नाही. शिवाय मानवी मेंदू व संगणकीय चिप्स यांचा संकर करुनही अधिक प्रगत अर्धयंत्रमानव बनवता येईल काय या शक्यतेवर केवळ विज्ञानिकाच नव्हे तर शास्त्रज्ञही विचार करत आहेत. म्हणजेच माणसाची जागा संगणक घेऊ लागतील अशी शक्यता येत्या २०-२५ वर्षांत नाकारता येत नाही. 

समजा उद्या सर्वच उद्योगांनी यंत्रमानव वापरायला सुरुवात केली व पगारी नोकरांची गरजच संपवली तर काय हाहा:कार उडु शकतो याची आपण कल्पना करु शकतो. कृत्रीम बुद्धीमत्तेच्या मानवसदृष संगणक-मानवाची निर्मिती झालीच तर मग तर मनुष्याचीच गरज राहणार नाही कि काय अशीही भिती आहेच. या सर्वांत कायदा महत्वाचा रोल बजावत प्रायोगिक पातळीवर सोडले तर अन्यत्र असे घडू दिले जानार नाही हा आपला आशावाद आहे. रोबोटिक्सचा उपयोग आजच अनेक क्षेत्रांत करायला सुरुवात झाली आहे. उद्या ती लाट सर्वत्र  पसरायला वेळ लागणार नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर फ़ोक्सकोन (Foxconn) या जगातील अवाढव्य कंत्राटी उत्पादक कंपनीचे घेता येईल. चीनमद्ध्ये २०११ साली या कंपनीचे दहा लाख कर्मचारी होते. याच वर्षी कंपनीने दहा हजार रोबो बसवले व "यंत्रमानवीकरणाची" सुरुवात केली. आता दरवर्षी तीस हजार रोबो बसवले जात आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टेरी गौ म्हणतात कि हाच दर ते प्रतिवर्षी एक लाख रोबो एवढा वाढवनार आहेत. याचाच अर्थ दहा लाख कर्मचा-यांची गरजच राहणार नाही. अन्य कंपन्यांचीही हीच दिशा आहे. 

याचा अर्थ आम्हा भारतियांना आजच समजावून घ्यावा लागणार आहे. एकीकडे रोजगार कमी होतील हे जेवढे सत्य आहे तसेच दुसरीकडे एव्गळ्या क्षेत्रांत मानवी रोजगारही वाढतील असा आशावाद अनेक अर्थतज्ञ करतात. कोणाचा आशावाद अत्य्हवा निराशाआद खरा ठरेल याचे भवितव्य वर्तवता येणे शक्य नसले तरे यंत्रमानव व कृत्रीम बुद्धीमत्ता ही आव्हाने आहेत हेही मात्र खरे.

वरील बाबतीत नैतिकतेचा सिद्धांत चर्चीला जातो. माणसाची जागा कृत्रिम श्रमकौशल्ये व कृत्रीम बुद्धीमत्तेला घेऊ देणे हे नैतिक होणार नाही कारण त्यामुळे माणसांचीच गरज संपेल  व हे नैतिक व मानवीय होणार नाही असा युक्तिवाद केला जातो. या युक्तिवादात नक्कीच तथ्य आहे. परंतू नतिकतेचाच इतिहास पाहिला तर माणसाने आपल्या नीतितत्वांतही सोयीनुसार फरक केल्याचे आपल्या लक्षत येइल. संगणक क्रांती येण्याआधी भारतात तिला नैतिकतेच्याच पातळीवर विरोध करणारे, अगदी विद्यमान सरकारात असलेल्या पक्षासहित, अनेक होते हे आपल्याला माहितच आहे. पण नीतिमुल्ये बदलतात. कायदेही बदलतात. त्यामुळे भविष्यात कायद्यांचे अथवा नैतिक मुल्यांचे संरक्षण राहीलच असे नाही. ते वेळ येताच जाऊ शकते याचे भान आम्हाला असले पाहिजे. कोणतीही नीतिमुल्ये ही स्थिर नसतात. भविष्यातील मुल्ये काय असतील्क याबाबतही आपल्याला विचार करावा लागणार आहे. प्रवाहाबरोबर नुसते दैवगती समजत वहात रहायचे कि प्रवाहालाच दिशा देणारे व्हायचे हे आमच्याच हाती आहे.

शिवाय सारी कामे यंत्रांनी केली व माणसाला काही कामच राहिले नाही तर तो उत्पन्न मिळवणार कोठुन? जगणार कसा? तो बाजारातुन काय व कसे खरेदी करेल कारण खरेदी करायला उत्पन्न म्हणजेच क्रयशक्ती लागते. रोबोंना शारिरिक गरजाच नसल्याने तो काही केल्या "खरेदीदार" होणार नाही.  थोडक्यात संपुर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडून पडेल. किंवा सर्व मानवी नागरिकांना फुकट वा अतिस्वस्त जीवनमान उपलब्ध करुन द्यावे लागेल. पण मग उद्योगांच्या नफेखोरीचे काय? नफ्याखेरीज ते कशाला उत्पादने करतील? किंवा असेही होईल कि रोबोटिक्सच्या वापरामुळे उत्पादनेच एवढी स्वस्त होतील कि अल्प रोजगारातही सर्वसामान्यांना सुखसमृद्ध जीवन जगता येईल अशी परिस्थिती निर्माण होईल. या सर्व शक्यतांवर आपल्याला सविस्तर विचार करणे भाग आहे कारण पुढील २०-२५ वर्षांत या सर्व घडामोडींत आपली भुमिका काय असेल, येणा-या परिस्थितीत आम्ही लाभाचे अधिक वाटेकरू बनत आमची किमान हानी कशी होईल याची रणनीति आम्हाला ठरवावीच लागेल. 

आजचा आमचा समाज मुळात शिक्षण म्हनजे काय व ते कसे द्यायला हवे याबाबतच चाचपडत आहे. आमचे सामाजिक प्रश्न अजुनही जातीपाती व धर्मधारित विवादांत अडकले आहेत. आरक्षण हाच आमच्या आजच्या सामाजिक गहन चर्चेचा व आंदोलनांचा विषय बनलेला आहे. आम्ही एवढे झापडबंद झालो आहोत कि आरक्षण ही एक सोय आहे, सामाजिक विकासाचा एकमेव मार्ग नाही हेही समजावून घेण्यात आम्हाला अपयश आले आहे. आमचे विचारवंतही त्याच प्रश्नांभोवती फिरत आपली विचार-रणनीति ठरवत आहेत. या सर्वांतून प्रगल्भ समाज निर्माण होण्याची प्रक्रिया कुंठित होत आहे. अशा वातावरणातून किंचित का होईना बाहेर येत भविष्यातील जगाचेही अवलोकन करत स्वत:ला सज्ज करण्याची आजच गरज आहे हे आम्हाला समजावून घेण्याची निकड आहे.

-संजय सोनवणी

Wednesday, January 27, 2016

मराठी कविता - महाराजा यशवंतराव होळकर


भारत भूमीच्या रक्षणाची, केली ज्यांनी गर्जना
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।धृ।।

इंग्रजांना हरेक युद्धांत, ज्यांनी चारली हो माती
पळता भुई थोडी हे करती, इंग्रजांनी खाल्ली भीती
ज्यांच्या राष्ट्रकार्यामुळे, अभिमान वाटावा मना
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०१।।

होळकरी काव्याने हे, महाराजा झुंजले किती
होळकरी बांडा झेंडा ज्यांनी, गाजविला भारती
ज्यांच्या पराक्रमापुढे झुकती, अजुनी सर्व माना
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०२।।

एकाकी झुंजले परी, कधी नाही हार मानिली
सदा तलवारीच्या टोकावर, ज्यांनी आव्हाने पेलली
शिकवण ज्यांची सदा होती, ठेवा ताठ पाठीचा कणा
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०३।। 

देशभक्तीमुळे इतिहासात जे, अजरामर हो झाले
स्वातंत्र्याची प्रथम ठिणगी जे, मनी पेटवूनी गेले
ही स्तुतिसुमने वाहतो, मिलिंद ज्यांच्या चरणां
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०४।।​

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)

'आम्ही धनगर' या कवितासंग्रहातून…

Tuesday, September 22, 2015

मराठी कविता - सुभेदार मल्हारराव होळकर (Subhedar Malharrao Holkar)



Milind Dombale (Deshmukh) । Marathi Kavita । Subhedar Malharrao Holkar
मिलिंद डोंबाळे (देशमुख) । मराठी कविता । सुभेदार मल्हारराव होळकर 

Wednesday, September 9, 2015

Sri Sant Ramjibaba (श्री संत रामजीबाबा)


पुणे शहराच्या लगतच चिंचवड गावापासून अगदी जवळच असलेल्या चांदखेड ता. मावळ या गावी पेशवाईचे काळात धनगर (खाटीक) या समाजात रामजीबाबा नावाचे एक संत पुरुष होऊन गेले. रामजीबाबांचा व्यवसाय म्हणजे मेंढरांचे पालन-पोषण करणे हा पिढीजात धंदा होता. खंडोबाची उपासना त्यांच्या घराण्यात परंपरेने चालू होती. त्या उपसनेमधूनच त्यांच्या ठिकाणी असे काही वैराग्य निर्माण झाले की, संसारी असून देखील ते विरागी बनले. प्रभूचिंतनात त्यांचा सर्व काळ जात असे व चिंतनामधूनच त्यांना ईश्वर प्राप्ती झाली.

रामजीबाबा हे चांदखेड गावातील घोलप घराण्यातील. घोलप घराणे खंडोबाचे भक्त होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील चांदखेड या गावीच झाला. रामजीबाबांचा संसार मावळ तालुक्यातच होता. त्या भागातील लोकांना वाटले की, संत तुकारामांनंतर हा एक त्यांच्याच मार्गाने जाणारा कोणीतरी दिव्य साधुपुरुष आपल्यामध्ये आवतरला आहे. त्यामुळे तेथील लोक बाबांच्या भजनी लागले. रामजीबाबांनी त्यांच्या आयुष्यात काही चमत्कार केल्याचे दाखले नाहीत. परंतु एकही चमत्कार न करतां देखील केवळ भक्तीमार्गांमुळे हजारो लोक त्यांच्या भजनी लागले होते.

रामजीबाबांनी तुकाराम महाराजांचे प्रमाणेच प्रपंच साधून परमेश्वाची सेवा व आराधना केली. रामजीबाबांची ओळख त्यावेळच्या समाज बांधवांना पटली नाही. परंतु समाजाच्या अत्यंत कठीण अवस्थेत त्यांनी लोकांना धीर दिला व भक्तीमार्गाने संकटाला सामोरे जाण्याचे शिकवले. काही लोकांनी त्यांची अवहेलना केली परंतु संताना देखील काही काळ अनुकूल असावा लागतो. त्या काळात अनेक संत महात्मे होऊन गेले. रामजीबाबा हे खंडोबाचे परमभक्त म्हणून ओळखले जावू लागले. समाजाला मार्गदर्शन करुन त्यांनी खंडोबाची भक्ती करण्याचा उपदेश केला.

रामाजीबाबा यांनी चांदखेड या गावीच आपला देह ठेवला व ते वयाच्या ५४ व्या वर्षी खंडोबाचे चरणी विलीन झाले. तो दिवस म्हणजे पौष शुध्द पौर्णिमेचा होता. दरवर्षी या तिथीला रामजीबाबांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरी केली जाते. महाराष्ट्रात शेकडो भक्त त्याठिकाणी जमतात. भजन, कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेतात. मुंबई येथील सर्वश्री बेंद्रे, खराटे, घोणे, घोडके या घराण्यातील लोक मोठ्या संख्येने येवून हा पुण्यतिथीचा सोहळा पार पडतात. समाजातील बाबांच्या भक्तांनीच चांदखेड येथील समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करुन भव्य सभा मंडप उभारला आहे.

अशा थोर संताचे चरणी आमचे विनम्र अभिवादन -  
पवित्र जे कुळ पावन तो देश । जेथे हरिचे दास जन्म घेती ।। 
कर्म धर्म त्याने झाला नारायण । त्याचेचि पावन तिन्ही लोक ।।  

संकलन - मिलिंद डोंबाळे (देशमुख) 
www.milind-dombale.blogspot.com 
(टिप - सदरचा लेख मी लिहिला नसून, एका जुन्या पुस्तकात तो प्रकाशित झाला होता व ते पृष्ठ फक्त माझ्या हातीं लागले. प्रयत्न करुनही लेखक व पुस्तकाचे नाव कळू शकले नाही. जर कोणास लेखक किंवा पुस्तकासंबधी काही माहिती असल्यास जरुर कळवावे)