Saturday, January 14, 2017
यंत्रमानव व कृत्रीम प्रज्ञेचे आव्हान!
समाज कसा असणार हे समाजात बुद्धीवंत, प्रज्ञावंत किती अहेत व ते कोणत्या दिशेने विचार करतात यावर जेवढे अवलंबुन असते तेवढेच ते अन्य राष्ट्रे कोणत्या दिशेने प्रगती करत जातात यावरही अवलंबुन असते. परकीय प्रभावाने समाजाची दिशा ठरने अनेकदा अडचणीचे असते कारण मुळात त्यांच्या प्रगतीचा मुलगाभा न समजताच अनुकरणातुन ही दिशा नाइलाजाने स्विकारावी लागत असते. आपल्याला तसे होणे परवडणारे नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
प्रगत राष्ट्रांत सध्या जोरदार चर्चा चालु आहे ती श्रमिकांची व कनिष्ठ कार्यांसाठी लागणा-या कर्मचा-यांची जागा यंत्रमानवांनी घेणे कितपत संयुक्तिक व नैतिक आहे यावर. औषधी उत्पादन, शेतकी ते अनेक रसायनी उद्योगांत अवाढव्य कारखाने यंत्रमानवांच्या वापराला पसंती देतांना दिसून येतात. काहींनी त्यांचा वापर सुरुही केला आहे. त्यात आता भर पदली आहे ती म्हणजे "कृत्रीम बुद्धीमत्ता" (Artificial Intelligence) या वेगाने विकसित होत चाललेल्य संकल्पनेची. येथे मानवी मेंदुची जागाच संगणक कसे घेतील याचा प्रयत्न सुरु आहे. संगणक सध्या माहितीचे विश्लेशन करतो पण निर्णय घेत नाही. आवाज ऐकुन त्याचे भावात्मक विश्लेषन करत नाही. वासही घेऊ शकत नाही कि पर्यावरणीय बदलांना प्रतिसादही देत नाही. विचार करणे हे मानवाचे महत्वाचे वैशिष्ट्य. पण सध्याचे संगणक विचार करु शकत नाही.
पण संगणकांनी तसे करावे...किंबहुना संगणकांनी मनुष्याचीच जागा घ्यावी यासाठी प्रयत्न होत आहेत. यासाठी पुंजयामिकीय संगणकप्रणाली (Quantum mechanic based system) बनवता येईल अशी संकल्पना मी १९९८ साली बेंगलोर येथे एका कार्यशाळेत मांडली होती. हे काम माझ्या हातून झाले नसले तरी आता जगात याही दिशेने प्रयत्न सुरु आहेत व त्याला कधी ना कधी यश मिळेल यातही शंका नाही. शिवाय मानवी मेंदू व संगणकीय चिप्स यांचा संकर करुनही अधिक प्रगत अर्धयंत्रमानव बनवता येईल काय या शक्यतेवर केवळ विज्ञानिकाच नव्हे तर शास्त्रज्ञही विचार करत आहेत. म्हणजेच माणसाची जागा संगणक घेऊ लागतील अशी शक्यता येत्या २०-२५ वर्षांत नाकारता येत नाही.
समजा उद्या सर्वच उद्योगांनी यंत्रमानव वापरायला सुरुवात केली व पगारी नोकरांची गरजच संपवली तर काय हाहा:कार उडु शकतो याची आपण कल्पना करु शकतो. कृत्रीम बुद्धीमत्तेच्या मानवसदृष संगणक-मानवाची निर्मिती झालीच तर मग तर मनुष्याचीच गरज राहणार नाही कि काय अशीही भिती आहेच. या सर्वांत कायदा महत्वाचा रोल बजावत प्रायोगिक पातळीवर सोडले तर अन्यत्र असे घडू दिले जानार नाही हा आपला आशावाद आहे. रोबोटिक्सचा उपयोग आजच अनेक क्षेत्रांत करायला सुरुवात झाली आहे. उद्या ती लाट सर्वत्र पसरायला वेळ लागणार नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर फ़ोक्सकोन (Foxconn) या जगातील अवाढव्य कंत्राटी उत्पादक कंपनीचे घेता येईल. चीनमद्ध्ये २०११ साली या कंपनीचे दहा लाख कर्मचारी होते. याच वर्षी कंपनीने दहा हजार रोबो बसवले व "यंत्रमानवीकरणाची" सुरुवात केली. आता दरवर्षी तीस हजार रोबो बसवले जात आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टेरी गौ म्हणतात कि हाच दर ते प्रतिवर्षी एक लाख रोबो एवढा वाढवनार आहेत. याचाच अर्थ दहा लाख कर्मचा-यांची गरजच राहणार नाही. अन्य कंपन्यांचीही हीच दिशा आहे.
याचा अर्थ आम्हा भारतियांना आजच समजावून घ्यावा लागणार आहे. एकीकडे रोजगार कमी होतील हे जेवढे सत्य आहे तसेच दुसरीकडे एव्गळ्या क्षेत्रांत मानवी रोजगारही वाढतील असा आशावाद अनेक अर्थतज्ञ करतात. कोणाचा आशावाद अत्य्हवा निराशाआद खरा ठरेल याचे भवितव्य वर्तवता येणे शक्य नसले तरे यंत्रमानव व कृत्रीम बुद्धीमत्ता ही आव्हाने आहेत हेही मात्र खरे.
वरील बाबतीत नैतिकतेचा सिद्धांत चर्चीला जातो. माणसाची जागा कृत्रिम श्रमकौशल्ये व कृत्रीम बुद्धीमत्तेला घेऊ देणे हे नैतिक होणार नाही कारण त्यामुळे माणसांचीच गरज संपेल व हे नैतिक व मानवीय होणार नाही असा युक्तिवाद केला जातो. या युक्तिवादात नक्कीच तथ्य आहे. परंतू नतिकतेचाच इतिहास पाहिला तर माणसाने आपल्या नीतितत्वांतही सोयीनुसार फरक केल्याचे आपल्या लक्षत येइल. संगणक क्रांती येण्याआधी भारतात तिला नैतिकतेच्याच पातळीवर विरोध करणारे, अगदी विद्यमान सरकारात असलेल्या पक्षासहित, अनेक होते हे आपल्याला माहितच आहे. पण नीतिमुल्ये बदलतात. कायदेही बदलतात. त्यामुळे भविष्यात कायद्यांचे अथवा नैतिक मुल्यांचे संरक्षण राहीलच असे नाही. ते वेळ येताच जाऊ शकते याचे भान आम्हाला असले पाहिजे. कोणतीही नीतिमुल्ये ही स्थिर नसतात. भविष्यातील मुल्ये काय असतील्क याबाबतही आपल्याला विचार करावा लागणार आहे. प्रवाहाबरोबर नुसते दैवगती समजत वहात रहायचे कि प्रवाहालाच दिशा देणारे व्हायचे हे आमच्याच हाती आहे.
शिवाय सारी कामे यंत्रांनी केली व माणसाला काही कामच राहिले नाही तर तो उत्पन्न मिळवणार कोठुन? जगणार कसा? तो बाजारातुन काय व कसे खरेदी करेल कारण खरेदी करायला उत्पन्न म्हणजेच क्रयशक्ती लागते. रोबोंना शारिरिक गरजाच नसल्याने तो काही केल्या "खरेदीदार" होणार नाही. थोडक्यात संपुर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडून पडेल. किंवा सर्व मानवी नागरिकांना फुकट वा अतिस्वस्त जीवनमान उपलब्ध करुन द्यावे लागेल. पण मग उद्योगांच्या नफेखोरीचे काय? नफ्याखेरीज ते कशाला उत्पादने करतील? किंवा असेही होईल कि रोबोटिक्सच्या वापरामुळे उत्पादनेच एवढी स्वस्त होतील कि अल्प रोजगारातही सर्वसामान्यांना सुखसमृद्ध जीवन जगता येईल अशी परिस्थिती निर्माण होईल. या सर्व शक्यतांवर आपल्याला सविस्तर विचार करणे भाग आहे कारण पुढील २०-२५ वर्षांत या सर्व घडामोडींत आपली भुमिका काय असेल, येणा-या परिस्थितीत आम्ही लाभाचे अधिक वाटेकरू बनत आमची किमान हानी कशी होईल याची रणनीति आम्हाला ठरवावीच लागेल.
आजचा आमचा समाज मुळात शिक्षण म्हनजे काय व ते कसे द्यायला हवे याबाबतच चाचपडत आहे. आमचे सामाजिक प्रश्न अजुनही जातीपाती व धर्मधारित विवादांत अडकले आहेत. आरक्षण हाच आमच्या आजच्या सामाजिक गहन चर्चेचा व आंदोलनांचा विषय बनलेला आहे. आम्ही एवढे झापडबंद झालो आहोत कि आरक्षण ही एक सोय आहे, सामाजिक विकासाचा एकमेव मार्ग नाही हेही समजावून घेण्यात आम्हाला अपयश आले आहे. आमचे विचारवंतही त्याच प्रश्नांभोवती फिरत आपली विचार-रणनीति ठरवत आहेत. या सर्वांतून प्रगल्भ समाज निर्माण होण्याची प्रक्रिया कुंठित होत आहे. अशा वातावरणातून किंचित का होईना बाहेर येत भविष्यातील जगाचेही अवलोकन करत स्वत:ला सज्ज करण्याची आजच गरज आहे हे आम्हाला समजावून घेण्याची निकड आहे.
-संजय सोनवणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment