मा. महादेव जानकर |
Monday, February 7, 2011
मनुवादी परंपरा विरुद्ध मानवतावादी परंपरा भाग १
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष मा. महादेव जानकर यांनी ‘विश्वाचा यशवंत नायक’ मासिकाच्या जानेवारी २००८ च्या अंकात लिहिलेला परखड लेख ..... मनुवादी परंपरा विरुद्ध मानवतावादी परंपरा भाग १
“Buffalo Nationalism” चे लेखक कांचा इलय्या २१ सप्टेंबर २००७ रोजी मुंबईत आले होते. “Reservation & Globalization, Myths & Truths” या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. धनगर समाजाच्या कांचा इलय्या यांनी ब्राह्मणवादी “Cow Nationalism” ची मांडणी केली. आणि भारतभर खळबळ उडवून दिली. तत्पूर्वी “Why I am not Hindu ?” हा ग्रंथ लिहून त्यांनी खळबळ माजवली होती. आई, वडील, बहिण निरक्षर असलेल्या कुरमा या धनगर समाजात जन्माला आलेले कांचा इलय्या भारतातील पहिल्या तीन सर्वश्रेष्ठ इंग्रजी लेखक, विचारवंत मधील एक मानले जातात.
जागतिकीकरणा बरोबर येणाऱ्या Cultural आणि Spiritual बदलामुळे दलित बहुजनांचा फायदा होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गोतम बुद्ध, येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर, कार्ल मार्क्स आणि डॉ. आंबेडकर हे जगातील पाच प्रेषित (Prophet) असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कांचा इलाय्यांनी डॉ. आंबेडकर यांना गोतम बुद्ध या जगातील पहिल्या महापुरुषानंतरचा भारतातील दुसरा आणि जगातील पाचवा आणि अखेरचा महापुरुष मानला आहे. डॉ. आंबेडकरांचे कर्तुत्व आणि नेतृत्व महान होते हेच यातून प्रत्ययाला येते.
डॉ. आंबेडकर ज्ञानाचे सागर होतेच. त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय लढ्याचे ते सर्वश्रेष्ठ सेनापतीही होते. डॉ. आंबेडकरांचा जसा अपमान झाला तसा पूर्वी अनेकवेळा अनेकांचा झाला होता. आजही होत आहे, परंतु आंबेडकर एकच पैदा झाले. त्या अपमानातून ‘आत्मभान’ आलेल्या डॉ. आंबेडकरांनी दैदिप्यमान कार्यकर्तुत्वाद्वारे (जादूच्या कांडीने नव्हे) कोट्यावधी अस्पृश्यांचा उद्धार केला. वंचित समाजाचा लढा कसा लढवावा याचा सर्वोत्तम आदर्श समोर ठेवला. शूद्र, ओबीसी, आदिवासी यांच्यासाठी वा कोणाही वंचित समाजासाठी हा लढा सर्वोत्तम आदर्श ठरतो. परंतु दलीतांसह ओबीसी, आदिवासींना हा आदर्श पेलता आला नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. पहिल्या किंवा दुसऱ्या जागतिक महायुद्धापेक्षा मोठे युद्ध डॉ. आंबेडकर हे भारतातील ब्राह्मणवादी, भांडवलवादी आणि सरंजामवादी व्यवस्थेविरुद्ध लढले. किंबहुना त्यांना मागे सरले. भारताच्या इतिहासात गोतम बुद्ध आणि सम्राट अशोकानंतर एवढे मोठे सामाजिक युद्ध कुणी लढले नाही. पशुतुल्य अस्पृश्यांना माणसाचे अधिकार मिळवून देणे हा एक चमत्कारच होता. त्यामुळे डॉ. आंबेडकर दलितांचे देव बनले तर त्यात नवल नाही. विज्ञानवादी दृष्टीकोन आणि बौद्ध धम्ममतामुळे हिंदू मानसिकतेच्या देवत्वाचे स्वरूप आलेले नसले तरी डॉ. आंबेडकरांना महामानव मानले जावू लागले.
व्यक्तीपुजेतून ब्राम्हणवादाला बळकटी मिळते असे सांगणाऱ्या डॉ. आंबेडकरांना माणूस म्हणून कोणाच्याही कार्याचे मूल्यमापन केले जावे असे अभिप्रेत होते. माणूस मोठा नसतो. येथून-तेथून माणूस सारखाच असतो. कामाने माणूस छोटा-मोठा ओळखला जातो असे आंबेडकरांचे म्हणणे होते. कार्याने कोणीही मोठा होवू शकतो हेच बुद्धांचे आणि आंबेडकरांचे मुख्य तत्वज्ञान होते. या अनुषंगातून कोणत्याही माणसाचे, मोठ्या मानल्या गेलेल्या व्यक्तींच्या जीवन आणि चरित्राचे मूल्यमापन व्हावे. त्यामधून आपला जीवनमार्ग ठरवावा आणि चालवावा हेच डॉ. आंबेडकर या कार्यकर्तुत्वाने महान बनलेल्या महामानवाला अभिप्रेत होते. म्हणूनच डॉ. आंबेडकर म्हणतात ‘ माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा (त्यात वेळ घालवण्यापेक्षा) मला अभिप्रेत असलेले कार्य करा.’ छ. शिवाजी महाराज असो, डॉ. आंबेडकर असो किंवा राजमाता अहिल्याबाई होळकर असो त्यांच्या अनुयायी वारसदारांनी काय केले, काय मिळवले यावर दृष्टीक्षेप टाकल्यास काय आढळते ? उपरोक्त महामानवानी जे मिळवले ते टीकवताही आले नाही असेच दिसते. उपरोक्त महामानवानी पेरले होते, वाढवले होते परंतु आम्हा वारसदारांना अनुयायांना ते नीट सांभाळून ठेवता आले नाही हे वास्तव आहे. यावर गांभीर्याने विचार करून कार्य करण्याची गरज आहे. पण असे का घडले ? फुले आणि फुलेवाद दोन्हीही विसरले गेले. परंतु डॉ. आंबेडकर विस्मृतीत गेले नाहीत किंबहुना त्यांच्या नावाचा भारतभर, जगभरात जयजयकार होत आहे. (अरुण शौरीसारखे काही कावळे ओरडले.) आरक्षण नावाचे साधन वा शस्त्र जपण्यासाठीच दलित चळवळीची ९९ % दमछाक होत आहे, उरलेले १ % धार्मिक आणि सांकृतिक कार्यात गुंतलेले आहेत.
Labels:
चळवळ,
मा. महादेव जानकर,
विश्वाचा यशवंत नायक
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment