मर्दानी लढली इंग्रजांसवे, रक्षिण्या स्वातंत्र्य देशाचे
शोभे माता लाडाबाई, पिता महाराजा यशवंत
पण कैदेतल्या बालपणाचे, आले नशिबी दुर्भाग्य
महाराजांनी, विजयी करुनी, हडपसरचे युद्ध
मुक्त केले, जुलमी जाचातूनी, कुटुंब-कबिल्यास
सुटता पुण्यातील कैदेतूनी, सुरुवात झाली शिक्षणास
तलवारबाजी घोडेस्वारी सारख्या, लष्करी प्रशिक्षणास
होता उपवर भिमाई, आनंदे संपन्न झाला विवाह
पती लाभले, सरदार बुळे घराण्यातील, गोविंदराव
नियतीने योजिला होता, एक नवा वेगळाच डाव
विवाहाच्या फक्त दोनच वर्षांत, माथी आले वैधव्य
पण दु:खाने हताश होईल ती, 'यशवंत-कन्या' कैसी ?
दु:ख सारुनी येउनी मिळे, पित्याच्या स्वातंत्र्य कार्यासी
देखी तोफांचे कारखाने, होळकरी सैन्याची भरती
अश्व-निवडींवर देखील चाले, नियंत्रण भीमाबाई
सरता थोडा काळ, झाला आणखी एक आघात
हरवले पितृछत्र, महाराजा यशवंत स्वर्गवास
संधी साधून मोक्याची, गोरे फिरंगी प्रयत्न करीती
तरीही जिंकणे अशक्य होती, इंदुरची होळकरशाही
फिरंग्यांनी साधुनी कुटनीती, फोडले अनेक सेनानी
खून तुळसाबाईंचा करुनी, दिले प्रेत नदीत टाकुनी
काही वर्षांतच तोंड फुटले, महिद्पुरच्या युद्धाला
पण त्यातही फितुरीचे काटे नडले, होळकरी सैन्याला
युद्धात महिद्पुरच्या, होळकरांनी केली शौर्याची बरसात
पण फितूर झालेल्या गफूरखानाने, रण सोडले ऐन जंगेत
विजय कमळ हातूनी निसटले, झाला तह इंग्रजासंगे
पण भीमाबाई तेथून निसटे, तीन हजार पेंढारी संगे
सदा राहुनी अरण्यवासी, गनिमीकावा मंत्र जपे
फिरंगी भयभीत असती, भीमाबाई करी गनिमी-हल्ले
फिरंग्यांचे खजिने लुटले, केली उध्वस्त अनेक तळे
हल्ले असती अति रांगडे, माल्कमही पळून जाये
पाठवी पत्रे सर्व राजांना, विनंती असे एकत्र लढयाची
प्रतिसाद नसे कोणाचा, तरी चालू ठेविला एकाकी लढा
माल्कमने टाकला मग नवा डाव, केला फितूर रोशनखान
धार नजीक असता तळ, केझरने केला हल्ला तत्काळ
हल्ला झाला चोहोबाजूंनी, पडली एकाकी ही वीरांगना
अखेर झाली कैद, करुनी ठेविले रामपुरा गढीत बंधिस्त
दुर्भाग्य जणू ह्या वीरांगनेचे, मृत्यूही आला कैदेत
विसावला भीमाबाई नावाचा, स्वातंत्र्यासाठीचा झंझावात
ठेऊनी जान त्या कर्तुत्वाची, घ्यावे राष्ट्रकार्य भीमाईचे समजुनी
नमोनि विंनती करे मिलिंद, सर्वांच्या चरणी ! सर्वांच्या चरणी !!
- मिलिंद डोंबाळे (देशमुख)