Tuesday, September 9, 2014

महादेव जानकर ! एक खडतर, तरीही “यशस्वी” प्रवास

माणूस कोठे पोहोचला, या पेक्षा तो कोठुन कोठे पोहोचला यावरून त्याला यशस्वी ठरविले पाहिजे, असे कोण्या एका विचारवंताने म्हटले आहे. राजाचा मुलगा जन्मताच राजपुत्र बनतो., नंतर तो राजा बनतो. एखादा दिल्लीस एका तासात पोहोचतो कारण तो जवळच आग्र्याला रहात असतो. परंतु दूर दक्षिणेत, सातार्याच्या रानमाळावर जन्म घेणारा जेंव्हा दिल्लीची वाट चालू लागतो, तेव्हा तो दिल्लीत पोहोचला की नाही या पेक्षा आता तो कोठे पोहोचला, यावरून त्याच्या यश-अपयशाचे मोजमाप केले जावे. वरील विचारवंताच्या म्हणण्याचा तोच मतितार्थ आहे.


महादेव जानकर यांचा जन्म मेंढरामागे फिरणार्या भटक्या, गरीब, धनगर कुटूंबात सातार्याच्या एका रानमाळावर झाला. गावी, तालुक्याच्या गावी, जिल्ह्याच्या ठिकाणी शिकत बी. ई. झाला. चांगली नोकरी करुन सुखाचा संसार थाटण्याचे सोडून समाजकारणासाठी - राजकारणासाठी तारुण्य सुलभ भावनेचा त्याग करुन समाजाचा संसार थाटण्याचा निर्धार तरुण महादेव जानकर याने केला. देवा – समाजा समोर तशी शपथ घेतली. माता – पिता - नात्याचा त्याग केला आणि एका खडतर प्रवासाचा आरंभ २५ वर्षापूर्वी सुरु केला. आणि आजही २५ वर्षानंतर ती वाट महादेव जानकर त्याच उत्साहाने चालत आहेत. 


३० जानेवारी १९९४ चा तो दिवस मला अजूनही काल घडल्या सारखा आठवतो. कुर्ला कोर्ट मैदान - मुंबई येथे एक सभा यशवंतसेने’तर्फे आयोजित केली गेली होती. समांतर महाराष्ट्र सरकार स्थापन करुन मंत्रीमंडळाचा शपथविधी तेथे झाला होता. त्या मंत्रीमंडळाचे मुख्यमंत्री म्हणून तरुण महादेव जानकर यांचा शपथविधी झाला होता. तेंव्हापासुन महादेव जानकर यांचा प्रवास मी पाहत आहे. महादेव जानकर यांच्याबद्दल लिहावे, अशी विनंती सदर पुस्तकाचे संपादक विट्ठल पडेर यांनी मला केला. महादेव जानकर यांच्या चळवळीबद्दल, विचाराबद्दल तसेच त्यांच्या कार्यशैली व स्वभावाबद्दल बोलण्यासारखे – लिहिण्यासारखे माझ्याकडे बरेच काही आहे. महादेव जानकर एक महासागर आहेत. त्यातून एक घागर काढून समोर ठेवली तरी संपूर्ण महादेव जानकर समजू शकतात.

महादेव जानकर `दिल्ली` ची भाषा करतात, परंतु अजुन ते `मुंबई` लाही पोहोचू शकले  नसल्याची `भाषा` केली जाते. भारताचा पंतप्रधान बनणार – या देशावर राज्य करणार, असे महादेव जानकर म्हणतात. परंतु ते अजुन आमदार – खासदार बनले नाहीत, अशी टिकाही केली जाते. “राजकारणासाठी“च ज्यांनी जिवन सर्वस्वाचा त्याग केला, त्या महादेव जानकर यांना “राजकारण” कळत नाही, असे ‘अकलेचे तारे’ ही “टीवी – बिवी”त मश्गूल असणारी मंडळी तोडत असतात. यामधे काही अज्ञानापोटी बोलतात तर काही प्रेमापोटी बोलतात.

शिकला – नोकरी केली - बंगला बांधला, पैसा कमावला, चांगला संसार केला, यात वैयक्तिक यश नक्कीच आहे. डॉक्टर, इंजिनीयर, प्राधापक, मोठे अधिकारी बनलात, यातही वैयक्तिक यश नक्कीच आहे. एनजीओ काढली  - शाळा बांधली - संस्था उभारल्या, यातही यश नक्कीच आहे. प्रस्थापित राजकीय पक्षातुन आमदार – खासदार – मंत्री बनलात, यातही यश नक्कीच आहे. परंतु देशातील ‘सर्वात मोठी तिजोरी’ आणि ‘सर्वात मोठी पावर’ ज्या ठिकाणी आहे, अशा  “संसद भवन – दिल्ली” ला ‘लक्ष्य’ करुन “स्वत:चा राजकीय पक्ष” निर्माण करण्यापर्यंत वाटचाल करणे, यात खुप मोठे यश आहे. २००३ साली पक्ष स्थापन करुन २०१३ पर्यन्त ग्रामपंचायत, ते विधानसभा- लोकसभा लढविणे आणि जिंकणे, यात खुप मोठे यश आहे. आपल्या पक्षाचा – राष्ट्रीय समाज पक्षाचा एक आमदार निवडून आणून ‘मुंबई’ त पोहोचविणे, यात खुप मोठे यश आहे. किंबहुना रानमाळातून आरंभ करुन मुंबई’च्या विधानसभेत स्व-निर्मित पक्षाचा आमदार निवडून आणने, या सारखे दूसरे यश नाही. आमदार – खासदार – मंत्री - मुख्यमंत्री – प्रधानमंत्री मोठे नसतात. नेता – पक्षनेता मोठा असतो. पृथ्वीराज चव्हाण वा मनमोहन सिंग मोठे नाहीत. सोनिया – किंबहुना राहुल ‘गांधी’ मोठे आहेत. सोनिया गांधी. शरद पवार, बाळ ठाकरे नेते आहेत. बाकी सर्व कार्यकर्ते आहेत. महादेव जानकर ही असेच एक नेता आहेत. एक राष्ट्रीय नेता आहेत. त्यांच्या पक्षाचे नावच मूळी ‘राष्ट्रीय’ समाज पक्ष आहे. विविध राज्यात महादेव जानकर यांना मानणारा, कोठे छोटा – कोठे मोठा वर्ग तयार झाला आहे. जगज्जेत्या सिकंदर’ला युद्धात हरलेला राजा पौरस म्हणतो, ‘ एका राजाने दुसर्या राजाला जशी वागणुक द्यावी, तशी मला वागणुक हवी.’  महादेव जानकर यांची प्रजा ते राजापद, अशी वाटचाल चालू आहे. कोंबडा आरवला नाही तरी, सूर्य उगवायचा थांबत नाही. तद्वत येथील माध्यमांनी म्हणावी तेवढी दाखल घेतली नसली तरी महादेव जानकर नावाचा सूर्य उगवायचा थांबला नाही व थांबणार नाही.

मला ११ मार्च १९९४ च्या कुर्ला येथेच, चैत्र पाडवा निमित्त आयोजित एका सभेची आठवण येते. त्यावेळी धनगर समाजाच्या नेत्यांमधे महादेव जानकर यांना शेवटचा मान दिला होता. नेत्रुत्वात त्याकाळी शेवटच्या स्थानावर असणारे महादेव जानकर, आज धनगर समाजात एक नंबरवर आहेत. नेत्रुत्वाच्या तुलनेत महादेव जानकर यांच्या आसपास ही महाराष्ट्रातच समाजात एक नंबरवर आहेत. नेत्रुत्वाच्या तुलनेत महादेव जानकर यांच्या आसपास ही महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात कोणी धनगर नेता मला दिसत नाही. प्रस्थापित पक्षात हे नेते आपले आणि आपल्या समाजाचे स्थान शोधत असताना महादेव जानकर यांनी आपला पक्ष स्थापन करुन केवळ धनगरच नव्हे तर तमाम उपेक्षित, दुर्लक्षित, दलित, मागास “राष्ट्रीय समाजा” साठी स्थान शोधत आहेत. ब्राह्मण – मराठा ते जैन – मुस्लिम अल्पसंख्य समाजाला राष्ट्रीय समाजाचा प्रमुख घटक मानतात. “एकात्म राष्ट्र निर्माण” हे त्यांनी आपले ध्येय बनविले आहे. राजकीय सत्ता हे साध्य तर राष्ट्रीय समाज पक्ष हे साधन आणि वाहन बनाविले आहे. अशक्य वाटावे असे ध्येय, त्यांनी उराशी बाळगले आहे. न थकता, मोठया चिकाटीने त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न महादेव जानकर करीत आहेत. का, कसे, कोणी, असे-तसे प्रश्न विचारत असताना त्यांच्या या वाटचालीत थोडा वाटा उचलू शकलो तर महादेव जानकर यांना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे.

आधुनिक युगातील महा-भारताचे चक्रव्युह भेदु पहाणार्या या नव अभिमन्युला साथ देता आली नाही तरी कोणी जयद्रथ बनू नये, एवढीच कळकळीची विनंती आहे. राज-पुत्र ते राजा असा महादेव जानकर यांचा प्रवास नसून तो रानोमाळ ते संसद भवन असा आहे. यामुळे महादेव जानकर यांच्याशी राहुल ‘गांधी’ वा  राज ‘ठाकरे’ वा अजित ‘पवार’ यांची तुलनाच होवू शकत नाही. महादेव जानकर हे एकमेव “महादेव - जानकर” आहेत. त्या सम फक्त तेच आहेत, दूसरा कोणी नाही. 

मा. महादेव जानकर आपल्या इप्सित ध्येयाप्रत लवकरात लवकर पोहोचो, हीच त्यांना मनपूर्वक शुभेच्छा !

- एस. एल. अक्कीसागर, मुंबई
अध्यक्ष – ऑल इंडिया रिजर्व बैंक ओ.बी.सी एम्प्लोयीज वेलफेअर असोसिएशन

0 comments: