Friday, August 28, 2015

मल्हारतंत्र

श्रीमंत सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांचा सपाट मैदानी प्रदेशातील गनिमीकावा अर्थात 'मल्हारतंत्र' ! 'सपाट मैदानी प्रदेशातील गनिमीकावा', ‘होळकरांचा-गनिमीकावा', 'होळकरी-कावा' किंवा 'मल्हारतंत्र' अशा अनेक नावांनी परिचित असलेला गनिमीकाव्याचा हा प्रकार 'मल्हारतंत्र' या नावानेच जास्त ओळखीचा आहे.

मल्हारबांच्या घोड्यांच्या टापांनी जवळपास अवघा भारत पिंजून काढला. मराठी साम्राज्याच्या विस्ताराचे गरुडस्तंभ ठरलेल्या मल्हाररावांनी अनेक युद्धात हेच तंत्र वापरले. दिल्लीच्या तख्तावर वर्चस्व ठेवले. त्यांच्यानंतर महाराजा यशवंतराव होळकर यांनीही पुढे याचाच वापर केला. मॉन्सनचा भीषण पराभव हे देखील याचेच उदाहरण !

होळकरांच्या या तंत्राविषयी प्रसिद्ध इतिहासकार श्री. यशवंत वासुदेव खरे (ऐतिहासिक लेख संग्रह - १५) लिहितात  -  “होळकरांचा गनिमीकावा विचित्र होता.  मैदानात समोरासमोर इंग्रजाशी लढण्याच्या भानगडीत पडत नसे. पहिल्याने घोडेस्वाराच्या लहान लहान टोळ्या दिसू लागत या लहान टोळ्याच्या पाठीशी घोडेस्वाराच्या मोठमोठ्या टोळ्या असत. इंग्रजी फौज चालून आली तर हे घोडदळ पळू लागे. इंग्रजी फौजेची पाठ वळताच हजारो मराठे घोडेस्वार चहूकडून हल्ले करीत आणि पिछाडीवर लांडगेतोड करीत. शत्रूभोवती घिरट्या घाल घालून मराठे संधी सापडेल तेंव्हा शत्रूची कत्तल करीत...” (सदर पुरावा उपलब्ध करून दिला तो आमचे पुणे स्थित मित्र सचिन शेंडगे यांनी…)

प्रसिध्द इतिहास संशोधक व लेखक श्री. संजय सोनवणी यांचे देखील मल्हारतंत्राविषयी मत आपण जाणून घेऊयात, त्यांच्या 'धनगर-गवळ्यांच्या अवनतीचा कालखंड' या त्यांच्या प्रकाशित लेखामध्ये ते लिहितात - "मल्हाररावांनी उत्तर तुडवली. सपाट प्रदेशातील गनीमी कावा विकसीत केला...इतका कि त्याला "मल्हारतंत्र" म्हटले जाते. पानिपत युद्धात गेलेली मराठेशाहीचे पत काही महिन्यांत परत मिळवली. इंग्रजांनाही गनीमी काव्यानेच धुळ चारली."

तसेच श्री. संजय सोनवणी यांनी लिहिलेल्या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या चरीत्र पुस्तकात ते लिहितात - "यशवंतरावांची युद्धनीती इंग्रजांना नेहमीच बुचकळ्यात टाकत राहिली. गनिमीकाव्याचा खरा उपयोग शिवरायांनंतर केला तो फक्त यशवंतरावांनी. गनिमीकावा हा फक्त पहाडी प्रदेशातच उपयुक्त असतो हे खोटे आहे, हे त्यांनी सिध्द करुन दाखवले. मॉन्सनचा भीषण पराभव हा गनिमीकाव्याचा खरेतर होळकरी-काव्याचा अभिनव आणि कल्पक नमुना होता. युध्दशास्त्राच्या अंगानेही त्याचे विश्लेषण व्हायला हवे. आधी शत्रूला आपल्या मागे आणून, मग त्याला उलटे पाळायला लावून, बदलत्या हवामानाचा अंदाज ठेवून, भर पावसाळ्यात गाळाच्या जमिनीत त्याची फजिती करत, तब्बल २५० मैल पाठलाग करत, क्रमाक्रमाने त्याची शक्ती कमी करत न्हेत कसे संपवावे, याचे हे एकमेव उदाहरण. या युद्धात इंग्रजांचे दहा हजारां पेक्षाही अधिक ठार झाले."

तरी देखील गनिमीकावा हा फक्त पहाडी प्रदेशातच उपयुक्त असतो असे म्हणणाऱ्यांना काय म्हणावे ?

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
www.milind-dombale.blogspot.com

0 comments: